वांग्याच्या पिकाला फुल न येण्याची ‘ही’ आहेत मुख्य कारणे! असे करा व्यवस्थापन, वांग्याला येईल भरपूर फुल

भाजीपाला पिकांच्या लागवडीमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी वांगे, मिरची तसेच वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी तसेच कारले, दोडके इत्यादी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते व टोमॅटोची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते.

Ajay Patil
Published:
brinjal crop

Brinjal Crop Management:-. भाजीपाला पिकांच्या लागवडीमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी वांगे, मिरची तसेच वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी तसेच कारले, दोडके इत्यादी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते व टोमॅटोची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते.

आपण जर कुठल्याही भाजीपाला पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जितक्या जास्त प्रमाणामध्ये या पिकांना फुले लागतात तितके जास्त प्रमाणात उत्पादन मिळते. त्यामुळे या भाजीपाला पिकांची फुलोरा अवस्था किंवा फुले जास्त प्रमाणात लागण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

यामध्ये जर आपण वांगे या भाजीपालापिकाकडे पाहिले तर बऱ्याचदा वांग्याला हवे त्या प्रमाणात फुल लागत नाही व साहजिकच यामुळे उत्पादनात घट येते.

तसे पाहायला गेले तर यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे आपण या लेखात काही संभाव्य कारणे व व्यवस्थापन बघणार आहोत. जेणेकरून वांग्याला चांगली फुलधारणा होऊन चांगले उत्पादन मिळेल.

वांग्याला फुले न येण्याची कारणे

1- नत्राचा जास्त वापर- कुठल्याही पिकाच्या वाढीकरिता नायट्रोजन आवश्यक असते व त्याकरिता आपण नत्राचा पुरवठा करत असतो. परंतु हाच नत्र किंवा नायट्रोजनचा वापर जास्त प्रमाणात झाला तर झाडाच्या पाने आणि देठांच्या वाढीला मदत होते. परंतु फुलांच्या निर्मितीची प्रक्रिया मात्र यामुळे विस्कळीत होते.

2- फॉस्फरस तसेच पोटॅश व इतर सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता- फुले आणि फळांच्या चांगल्या विकासाकरिता फॉस्फरस आणि पोटॅश सारखी पोषक तत्त्वे गरजेचे असतात. परंतु या पोषक घटकांची जर कमतरता झाली तर मात्र फुलांच्या निर्मितीची प्रक्रिया मंद स्वरूपात होऊ शकते. याशिवाय बोरॉन आणि झिंक यासारखे पोषक घटक देखील फुलांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे समजले जातात.

3- चुकीचे पाणी व्यवस्थापन- पाण्याचा अति प्रमाणात वापर करणे किंवा अपुऱ्या स्वरूपात वापर देखील यासाठी कारणीभूत ठरू शकतो. पाण्याचा जास्त किंवा कमी वापर केल्यामुळे झाडाच्या वाढीवर आणि विकासावर विपरीत परिणाम होतो. पाणी जास्त झाले तर मुळे कूजतात आणि झाडांची ऊर्जा फुलांच्या निर्मितीवर खर्च होण्याऐवजी झाडाच्या वाढीवर खर्च होते व फुले कमी लागतात.

4- हवामानाची परिस्थिती- वांग्याचे रोप जर आपण पाहिले तर ते मध्यम तापमानामध्ये चांगल्या प्रकारे वाढते. परंतु जास्त प्रमाणामध्ये उष्णता असेल किंवा थंडी असेल तर फुलांच्या निर्मिती प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो व फुले कमी लागतात.

5- रोग आणि कीटक- वांगे पिकामध्ये व्हर्टिसिलियम विल्ट सारखे रोग किंवा पांढरी माशी आणि थ्रिप्स सारखे कीटक फुलांच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणू शकतात व फुले कमी लागू शकतात.

6- चुकीची लागवड पद्धत- जर वांग्याची लागवड करताना जर दाट म्हणजेच मोठ्या संख्येने झाडे एकमेकांच्या जवळ लावले तर झाडांना योग्य प्रकाश तसेच हवा आणि पोषक तत्त्वे मिळत नाहीत व त्यामुळे फुले तयार व्हायला अडथळा निर्माण होऊन फुले कमी लागतात.

वांग्याला फुले जास्त येण्यासाठी व्यवस्थापनाच्या पद्धती

1- संतुलित पद्धतीचे पोषण व्यवस्थापन- नायट्रोजन तसेच स्फूरद आणि पालाश यांचा समतोल प्रमाणात वापर करावा व रोपांच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नायट्रोजन वापरावा आणि फुलांच्या वेळी त्याचे प्रमाण कमी करावे.

नायट्रोजन 120 किलो हेक्टरी तीन हप्त्यात विभागून द्यावा व यातील पहिला हप्ता लागवड केल्यानंतर पंधरा दिवसांनी, दुसरा हप्ता देताना मात्र फुलोराच्या वेळी जर वनस्पतीची वाढ चांगली होत असेल तर नत्राचा दुसरा हप्ता देऊ नये व त्यानंतर फळ जेव्हा तयार होते तेव्हा तिसरा हप्ता द्यावा.

तसेच फुलांची निर्मिती प्रक्रियेला चालना मिळावी याकरिता पोटॅश व फॉस्फरस युक्त खतांचा वापर करावा. यामध्ये प्रामुख्याने सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश यांचा वापर करावा. यामध्ये स्फुरद व पोटॅश दोन्ही 60-60 किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात द्यावे. स्फुरद व पालाश या दोन्हींची संपूर्ण मात्रा शेत तयार करताना द्यावी.

याशिवाय बोरॉन आणि झिंक यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी 0.2 टक्के किंवा झिंक सल्फेट 25 किलो हेक्टरी आणि बोरॉन दहा किलो हेक्टरी फवारणी शेत तयार करतानाच करावी.माती परीक्षण जर केले तर उत्तम ठरू शकते. कारण माती परीक्षणानुसार पोषक तत्वे तुम्हाला ठरवण्यास मदत होते. बोरॉनचा योग्य पुरवठा केला तर फुलांच्या निर्मितीत आणि परागकणात मदत होते.

2- सिंचन व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे- तसेच रोपांच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. वांग्याला पाणी देताना पाणी साचणार नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे व याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी आणि झाडांना योग्य प्रमाणात पाणी द्यावे.

3- योग्य तापमान आणि हवामान व्यवस्थापन- तसेच महत्त्वाचे म्हणजे अति उष्णतेपासून संरक्षण करण्याकरिता शेडनेटिंग किंवा मल्चिंगचा वापर करावा. थंड हवामान असेल तर झाडांना प्लास्टिकच्या आवरणाने झाकून ठेवावे.

4- रोग आणि कीड व्यवस्थापन- वांग्याची लागवड करताना रोगप्रतिरोधक म्हणजेच रोगांना प्रतिकारक्षम अशा जातींची निवड करावी. शेतामध्ये नेहमीच निरीक्षण करावे आणि कीटकांना आकर्षित करण्यासाठी फेरोमोन सापळे आणि पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.

5- पिक रोटेशन पद्धतीचा अवलंब करणे- पिक रोटेशन पद्धतीचा अवलंब करून जमिनीतील पोषक तत्वांचे स्थिरता राखणे गरजेचे असते व रोटेशन पद्धतीमध्ये ज्या पिकांच्या माध्यमातून जमिनीत नायट्रोजन निश्चित करण्यास मदत होईल अशा पिकांचा समावेश करावा. उदाहरणार्थ शेंगवर्गीय पिके तुम्ही समाविष्ट करू शकतात.

6- लागवडीचे योग्य अंतर- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लागवड करताना 60 ते 70 cm च्या अंतरावर लागवड करावी. त्यामुळे झाडांना पुरेसा प्रकाश आणि पोषक तत्वे मिळायला मदत होते.

7- वाढ नियंत्रकांची म्हणजेच ग्रोथ रेग्युलेटरची फवारणी- फुल निर्मिती प्रक्रियेला चालना देण्याकरिता नेपथालीन ऍसिटिक ऍसिड म्हणजेच एनएए 20-25 पीपीएम किंवा प्लेनोफिक्स एक मिली प्रति पाच लिटर पाण्यात वाढ नियंत्रकांची फवारणी करावी व जेव्हा पीक फुलाच्या टप्प्यात म्हणजेच फुलोराच्या टप्प्यावर असेल तेव्हा त्याचा वापर करावा.

8- योग्य वेळी पिकाची छाटणी करणे- वनस्पतीवृद्धी म्हणजेच झाडांची वाढ नियंत्रित करण्यासाठी रोपांची छाटणी करणे गरजेचे आहे. असे केल्यामुळे झाडांना ऊर्जा वाचवायला मदत होते व ही ऊर्जा फुले आणि फळांच्या विकासासाठी वापरली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe