Missing Link Cable Bridge Project:- महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे हे दोन्ही महत्त्वाचे शहरे असून या दोन्ही शहरादरम्यान दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. रस्ते मार्गाने प्रवास करताना मात्र प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्या येतात. जेव्हा मुंबई ते पुणे प्रवास केला जातो तेव्हा खोपोली जवळ घाट पार करून जावे लागते व या घाट परिसरामध्ये अनेकदा वाहतूक कोंडी तसेच अपघात घडतात.
पावसाळ्यात तर या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात भूस्खलन होऊन अनेकदा वाहतूक विस्कळीत होते व मुंबई-पुणे हा मार्ग बऱ्याचदा बंद करावा लागतो. त्यामुळे या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली एक्झिट पासून कूसगाव यादरम्यानच्या अंतरात 13.3 किमी अंतराचा मिसिंग लिंक केबल ब्रिज प्रकल्प उभारला जात असून या प्रकल्पाचे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे
व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबईहून पुण्याला जायला आता जो काही वेळ लागतो त्या वेळेपेक्षा 25 मिनिटे आधी पोहोचणे शक्य होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जून 2025 पासून हा प्रकल्प कार्यान्वित होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे व मुंबई ते पुणे या दोन्ही शहरातील अंतर जवळपास सहा किलोमीटरने कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन डोंगरांमध्ये देशातील सर्वात उंच केबल ब्रिज असणार आहे.
भारतातील सर्वात उंच केबल मिसिंग लिंक प्रकल्प कसा आहे?
मुंबई-पुणे दरम्यान उभारला जात असलेला देशातील सर्वात उंच केबल ब्रिज हा 183 मीटर उंच असून जवळपास 80 टक्के काम आता पूर्ण होत आले आहे. सध्या जर आपण खोपोली एक्झिट पासून सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर जर बघितले तर ते साधारणपणे 19 किलोमीटर आहे.
परंतु जेव्हा या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल तेव्हा हे 19 किलोमीटरचे अंतर 13.3 किलोमीटर होणार आहे. या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जात असून या मिसिंग लिंक प्रोजेक्टची लांबी 13.3 किलोमीटर इतकी आहे.
या अंतरामध्ये दोन टनेल आणि दोन केबल ब्रिज असणार असून या एकूण 13.13 किलोमीटर अंतरापैकी 11 किलोमीटर लांब टनेल असणार आहे तर दोन किलोमीटर लांबचे केबल ब्रिज असणार आहेत व त्यांची लांबी दोन किलोमीटर आहे.
तसेच या अंतरामध्ये उभारले जात असलेल्या दोन्ही टनेलचे खोदकाम पूर्ण झाले असून फिनिशिंगचे काम सध्या सुरू आहे. मुंबई- पुणे प्रवास करताना खोपोली जवळ घाटामध्ये ज्या काही दुर्घटना किंवा पावसाळ्यात वाहतूक कोंडीच्या समस्या होतात त्या या प्रकल्पामुळे कमी होण्यास मदत होणार आहे व प्रवाशांन कुठल्याही समस्या शिवाय प्रवास करता येणार आहे.
विशेष म्हणजे ज्या परिसरामध्ये हा ब्रिज उभारला जात आहे त्या ठिकाणी सामान्यपणे 25 ते 30 किमी ताशी आणि सर्वाधिक 50 किमी इतक्या वाऱ्याचा वेग असतो अशा ठिकाणी या प्रकल्पाचे काम सुरू आहे व या केबल ब्रिजचे वैशिष्ट्य म्हणजे हवेचा 250 किमी ताशी वेग देखील सहन करण्याची क्षमता यामध्ये आहे.
या मिसिंग लिंक वरून 100 किमीच्या वेगाने वाहने जाऊ शकते. तसेच वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन या या ब्रिजचे डिझाईन करण्यात आले असून हे डिझाईन परदेशात टेस्ट केल्यानंतर भारतात तयार करण्यात आले आहे.
या केबल ब्रिजच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण
850 मीटर लांब व 26 मीटर रुंद असे दोन केबल ब्रिज दोन टप्प्यांमध्ये बांधले जात आहेत व यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे व दुसऱ्या टप्प्याचे काम आता प्रगतीपथावर आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणारी वाहने डोंगरात बांधलेल्या बोगद्यातून मिसिंग लिंकमध्ये प्रवेश करतील
व बोगदयातून जेव्हा बाहेर पडतील त्यानंतर ही वाहने 183 मीटर उंच पुलावरून दुसऱ्या डोंगरात बांधलेल्या टनेल पर्यंत पोहोचतील. मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाच्या बांधकामात 31 हजार टन स्टीलचा वापर केला जाणार आहे तर साडेतीन लाख घनमीटर काँक्रीट वापरण्यात येणार आहे. या ब्रिजचे आयुष्य पुढील शंभर वर्ष असेल अशी देखील माहिती देण्यात आली आहे.