बाळासाहेब थोरतांपुढे पक्ष जिवंत ठेवण्याचे आव्हान

Ahmednagarlive24
Published:

नेवासा – कॉंग्रेस पक्षाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी नेते प्रयत्नशिल आहेत. मात्र दुसरीकडे वर्षानुवर्षे खुर्च्या उबविणाऱ्या नेत्यांच्या काळात नेवासा तालुक्‍यात पक्षाला पदाधिकारी शोधण्याची वेळ अली आहे.

त्यामुळे ना नेते ना कार्यकर्ते, कॉंग्रेस चाचपडते भलतीकडे असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नेवाशात पक्ष जिवंत ठेवण्याचे आव्हान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नगर जिल्ह्यातील असले, तरी नेवाशात पक्षाची वाताहत झाली आहे. अनेक वर्षे सत्ता भोगणाऱ्या कॉंग्रेसला सध्या नेवाशात बुरे दिन आल्याचे चित्र पहायला मिळत आहेत.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात प्रदेशाध्यक्ष थोरतांपुढे पक्ष जीवंत करण्याचे तगडे आव्हान आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी दरम्यान पक्ष चांगलाच बॅकफूटवर गेला आहे.

सध्या तालुक्‍यात राष्ट्रवादी, क्रांतिकारी व भाजप हे पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. नेवासा नगरपंचायत निवडणुकीतही भाजप या राज्य व केंद्रात सत्तारुढ असलेल्या पक्षाला टक्कर देण्याचा प्रयत्न क्रांतिकारीने केला होता.

संधी मिळेत तेव्हा ताकद आजमावण्याचे काम क्रांतिकारी करत आहे. मात्र दुसरीकडे वर्षानुवर्षे सत्तेची ऊब घेणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांना आपण विरोधक आहोत, याचेही भान नसल्याने त्यांना त्याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे.

कॉंग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अनेक आंदोलने झाली. मात्र त्यास बोटांवर मोजण्याऐवढेच कार्यकर्ते दिसून आले. जिल्ह्यात यापूर्वी कॉंग्रेस सत्तेत असताना दोन मंत्रिपदे होती.

आजही सत्तेत नसताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यांना माणणारा मोठा गट होता. मात्र सोयरे-धायरे, सोयीच्या राजकारणाची लागण पक्षाला लागली होती.

सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना देखील पक्षाचा एकही कार्यक्रम अद्यापपर्यंत तालुक्‍यात झालेला नाही. त्यामुळे पक्ष तालुक्‍यात अस्तित्व शोधत असल्याची स्थिती आहे.

याकडे प्रदेशाध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याने प्रभारी जिल्हाध्यक्षांनीही कानाडोळा केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसची कार्यकारिणी आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे पक्षाचे तालुक्‍यात भवितव्य काय, असा प्रश्‍न आहे.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment