मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरेच घेणार युतीचा निर्णय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- शिवसेना-भाजप युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे घेतील. आम्ही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत तयारी केली आहे.

ज्यांनी मुलाखती दिल्या, त्यांचा अहवाल प्रदेशला पाठवण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रामदास आंबटकर यांनी बुधवारी दिली.

भाजप इच्छुकांच्या मुलाखती आंबटकर यांनी घेतल्या. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रकाश चित्ते, प्रसाद ढोकरीकर या वेळी उपस्थित होते. आंबटकर म्हणाले, भाजप-सेनेची युती २५ वर्षांपासून आहे.

या निवडणुकीत युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शहा व शिवसेनेचे उध्दव ठाकरे घेतील. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल आंबटकर म्हणाले, रोहित आता आले आहेत. त्यांना राजकारण माहीत नाही.

आवश्यकता वाटली तेथे आम्ही प्रवेश दिले आहेत. निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कोअर कमिटीची बैठक झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बेरड यांनी दिली. विद्यमान सर्व आमदारांनी मुलाखती दिल्या आहेत. शिवसेनेबरोबर युतीसंदर्भातील निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे.

मात्र, आम्ही जिल्ह्यातील बाराही जागांची तयारी केली आहे. या बैठकीला खासदार सुजय विखे, सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, चार सरचिटणीसांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या? निवडणुकीची तयारी कशी करायची? यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment