Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी सुरु करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. पण अलीकडेच सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना जोर आला. महिलांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता राज्य सरकारकडून या बाबतीत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेबाबत सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ती सुरूच राहणार आहे. महायुती सरकार आपल्या वचनांप्रती कटिबद्ध आहे,” असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांनी जनतेला केलं.

या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या अखेरीस जमा होईल, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे लाभार्थींनी चिंता न करता नियमितपणे आपले बँक व्यवहार तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विरोधकांचा आरोप
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात महायुतीच्या नेत्यांनी लाभार्थींना दर महिन्याला 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप तो निर्णय प्रत्यक्षात आला नाही. यामुळे विरोधक सरकारवर टीका करत आहेत की, निवडणूक जिंकल्यावर सरकारने वचनपूर्तीपासून पळ काढला आहे.
2100 रुपये कधी मिळणार?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेच्या विस्तारीकरणाबाबत विधानसभेत आश्वासन दिलं होतं की, “पात्र महिलांवर अन्याय होणार नाही. 2,100 रुपये देण्याचा योग्य तो निर्णय सरकार लवकरच घेईल.” तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही सांगितलं की, “महायुती सरकार योग्य वेळ आली की निधी वाढवेल आणि त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.”
राजकीय अफवा की रणनीतीचा भाग?
विरोधक वारंवार ही योजना बंद होणार असल्याचा दावा करत असून त्यामुळे सामान्य महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, सरकारकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या स्पष्टीकरणामुळे हे स्पष्ट होत आहे की, ही योजना केवळ सुरूच राहणार नाही, तर भविष्यात अधिक सक्षमपणे राबवली जाणार आहे.
योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही केवळ आर्थिक मदतीची योजना नाही, तर ती महिलांच्या सक्षमीकरणाचा भाग आहे. सरकारने ती बंद होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे. भविष्यकाळात 2,100 रुपयांचा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा लाभार्थींना आहे.