अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी, अशा गुन्हेगारी स्वरूपांच्या घटनांमध्ये जास्तच वाढ होऊ लागली आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे येथील पोलीस प्रशासनाच्या कामाबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे.
संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा सध्याच्या स्थितीला चोरट्यांचा हॉटस्पॉट बनला आहे. जनावरे चोरी, दुचाकी, चारचाकी आदी चोरीच्या घटना याठिकाणी घडू लागल्या आहेत. नुकतीच दसऱ्याच्या दिवशी पुन्हा चोरट्यांनी बोटा गावातून स्विफ्ट कार चोरून पोबारा केला आहे.
त्यामुळे घारगाव पोलीस नेमके करतात तरी काय असा प्रश्न सर्व सामान्यांतून विचारला जात आहे. सहा दिवसांपूर्वीच बिरेवाडी येथील नवनाथ ढेंबरे या पशुपालकाने आपल्या नव्वद हजार रूपये किंमतीच्या दोन जर्शी गायी घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बांधल्या होत्या.
अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पहाटेच्या वेळी दोन्ही गायी चोरून पोबारा केला आहे. तोच पुन्हा चोरट्याने दिवसाढवळ्या घारगाव बसस्थानक येथून रोहिदास काशिनाथ तळपे यांची पस्तीस हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून पोबारा केला आहे. याही दुचाकी चोरीचा शोध लागला नाही.
या चोरीच्या सर्व घटना ताज्या असतानाच पुन्हा तीन ते चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी बोटा येथील गणेश गंगाधर पवार यांची दोन लाख रूपये किंमतीची स्विफ्ट कार (क्र.एम.एच. 18, डब्ल्यू.6525) ही चोरून पोबारा केला आहे.
चोरटे एवढे सक्रिय झाले असताना पोलीस प्रशासन एवढे निष्क्रिय का झाले? असा सवाल संतप्त ग्रामस्थ करत आहे. सणासुदीमध्ये तरी नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईसाठी कंबर कसणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन दीपावलीत चोर्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved