कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊनही कामे रखडलेलीच; जनतेमध्ये नाराजीचा सूर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- नाशिक व नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या नांदूर शिंगोटे ते लोणी, कोल्हार या राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, आगामी दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार होते.

मात्र या कामाला कार्यारंभ आदेश देवूनही अद्याप सुरवात न झाल्याने, जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. दळणवळणाच्या सोईसाठी महत्वाचा असलेला हा राज्यमार्ग गेल्या तीन चार वर्षांपासून लहान मोठ्या खड्ड्यांनी व्यापल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघातही झाले आहेत. या भागातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा पाठपुरावा केला होता.

या कामासाठी नाशिकच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने निविदा मंजूर करुन, कार्यारंभ आदेशही दिल्याने लवकरच या कामाला सुरवात होण्याची अपेक्षा होती.

मात्र संबंधित कंत्राटदारांना दोन महिन्यांपूर्वीच कार्यारंभ आदेश देऊनही, रस्त्याचे काम सुरू करण्याची कोणतीही कार्यवाही प्रत्यक्षात दिसून येत नसल्याने जनतेमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.

या अंतर्गत सुमारे सात मिटर रुंदीचे दोन अस्तरांचे डांबरीकरण, दुतर्फा साईडपट्ट्या असे कामाचे स्वरुप आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी या गावांमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी जागरुक राहणे आवश्‍यक आहे.

कामामध्ये निकृष्टपणा जाणवल्यास थेट राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चकोर यांनी केले आहे.

दरम्यान कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊन देखील कामे होणार नसल्यास अशा ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होते आहे.

रस्त्याचे काम योग्यपद्धतीने झाल्यास येथील दळणवळणाचा प्रश्नच कायमचा सुटून जाईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe