अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- ब्रिटीश काळात भंडारदरा येथे जलाशयाचे काम सुरू असताना इंग्रज अधिकाऱ्यांकडून मजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड करणाऱ्या पार्वताबाई महादू नवले (वय १०५) यांचे निधन झाले.
अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणाऱ्या गुहिरे गावात राहणाऱ्या या आदिवासी महिलेने ब्रिटीश काळात भंडारदरा धरणाच्या उभारणीच्या कामावर जाऊन मजुरी केली. त्यावेळी इंग्रज राजवटीला व त्यांच्या अन्यायाला झुगारून मजुरांचे संघटन करून बंडाचे निशाण त्यांनी उभारले होते.

आदिवासी भागातील ही गृहिणी अशिक्षित असली तरी जिद्दी होती. १९१५ रोजी कळसूबाई गडाच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावात भारमल कुटुंबात जन्मलेल्या पार्वताबाई यांना लहानपणापासून कंदमुळे, झाडपाल्यांच्या औषधी उपयोगाचा अभ्यास होता.
झाडपाला व कंदमुळे गोळा करून परिसरातील रुग्णांना त्या बऱ्या करीत. त्यांचे लग्न झाल्यानंतर त्या गुहिरे येथे आल्या. त्यावेळी भंडारदरा येथे जलाशयाचे काम सुरू असताना त्यांनी त्या कामावर मजुरी केली. आपलं शिक्षण झाले नसले तरी मुलांना त्यांनी शिक्षण दिले. नातवंडांदेखील अधिकारी बनवले.
काबाडकष्ट करून त्यांनी आपले कुटुंब सावरले. पुरुषाला लाजवेल असे त्यांचे काम होते. शंभर किलोचे धान्याचे पोते डोक्यावर व पाठीवर घेऊन दहा किलोमीटर पायी त्या जात असत. रानात जनावर चरण्यासाठी गेल्या असता वाघाशी झुंज देऊन त्यांनी वाघाच्या तावडीतून गाय सोडवली होती.
बंडखोर कोंड्या नवले यांच्या ब्रिटिशांविरोधातील बंडाला ताकद देण्याचे व त्याला भाकरी देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्यामागे ५ मुले तसेच नातवंडे, पणती असा परिवार आहे. शिक्षक सोमनाथ नवले यांच्या त्या मातोश्री होत. स्वातंत्र्य सैनिकांना भाकरी देऊन त्यांना त्या मदत करत होत्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved