अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत गुन्हेगारी हळूहळू डोके वर काढत आहे. गुरुवारी रात्री काही गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारीजवळील राहाणाऱ्या रवींद्र साहेबराव माळी (वय ३७) या किराणा दुकानदाराचा मानेवर चाकुने वार करून खून केला.
या प्रकरणी ११ जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डीच्या शासकीय गेस्ट हाऊससमोरील देशमुख चारी येथे निमगाव हद्दीमध्ये रवींद्र साहेबराव माळी यांचे व आरोपींचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते.
याची तक्रार शिर्डी पोलीस स्टेशनला रवींद्र माळी यांनी केली होती. याचा राग धरून अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील, रवींद्र बनसोडे, समीर शेख, अज्जु पठाण, रंजना वैजनाथ भांगे, ललिता रमेश पाटील, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाड,
कुणाल जगताप या ११ जणांनी १९ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास देशमुख चारीजवळ रवींद्र माळी यांना तीन जणांनी पकडून बाकीच्यांनी त्यांच्या मानेवर चाकुने वार केले व त्यांचा खून केला. यामुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तातडीने परिसरात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरितांचा शोध सुरू आहे.
रवींद्र माळी यांचा मुलगा रोहित याने दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved