अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
नुकतीच चांदबीबी महाल या पर्यटनस्थळाच्या आसपास बिबट्याचे दर्शन झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे या परिसरात फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. नगर शहरालगत असलेल्या चांदबिबी महाल वनक्षेत्र परिसरांमध्ये आज रात्री तीन ते चार बिबटे एकाच वेळेस फिरताना दिसले.
याच परिसरात फिरायला गेलेल्या एका नागरिकास हे बिबटे दिसून आले. त्या व्यक्तीने संबंधित परिसरात एक , दोन नव्हे तर चक्क चार बिबट्यांचा वावर या परिसरात पहिला आहे. त्यांनी या बिबट्यांचे चित्रिकरण देखील केले. समाज माध्यमांवर हे चित्रीकरण चांगलेच व्हायरल झाले आहे.
चांदबिबी महाल वनक्षेत्र परिसरातून पुढे पाथर्डीपर्यंत गर्भगिरी अरण्याचा पट्टा सुरू होतो. पाथर्डीतील वनक्षेत्र परिसरांमध्ये बिबट्याचे नागरिकांवर हल्ले होत आहेत. शिरसाटवाडी परिसरातील तीन बालकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला आहे. काल भगवानगड परिसर पायथ्याशी देखील बिबट्याने महिलेवर हल्ला केला.
यातच चांदबिबी वनक्षेत्र परिसरांमध्ये एकाच वेळेस तीन ते चार बिबटे एकाच ठिकाणी दिसण्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरांमध्ये नागरिकांनी पहाटे फिरण्यास पायी, सायकल किंवा दुचाकीवरून जाऊ नये, रात्रीच्या वेळेस या भागांमध्ये संचार टाळावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
दरम्यान वन विभागाने उद्यापासून चांदबिबी महाल परिसरातील वनक्षेत्रामध्ये नागरिकांना प्रतिबंध केला आहे. विनापरवानगी वनक्षेत्रात फिरल्यास संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याचा इशाराही वन विभागाने दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved