पाथर्डी :- नगर दक्षिण लोकसभा निवडणूक काही महिन्यावंर येऊन ठेपली असल्याने भाजपाकडून नेमके कोणाला निवडणूक रिंगणात उतरवले जाणार हे अद्याप ठरलेलं नाही.
राहुरी- नगर -पाथर्डीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडून पुढे येऊ लागल्याने मतदारसंघात आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

नगर दक्षिणमधून जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे हे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी दोन वर्षांपासून कामाला लागले आहेत. विखे नेमकी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार, याबाबत संदिग्ध परिस्थिती असली तरी ते मैदानात उतरणार हे मात्र नक्की.
विखे यांच्याविरोधात आ. शिवाजी कर्डिले यांनी अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये फिरवलेली जादूची कांडी पक्षश्रेष्ठींसाठी चर्चेचा विषय ठरली, आ. कर्डिले हे सध्या जिल्हयातील राजकारणातील किंगमेकर असून, ज्याच्या डोक्यावर त्यांचा हात राहील, तोच दक्षिणेचा खासदार होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी निंबोडी, ता. पाथर्डी येथील एका कार्यक्रमात केले.
निंबोडी येथील कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासू म्हणून ओळखले जाणारे आ. प्रसाद लाड, आ. कर्डिले, आ. राजळे एकाच व्यासपीठावर आले असता, नगर जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांचे काहीवेळ झालेले गुप्तगू चर्चेचा विषय ठरला आहे.
दक्षिणेतून खा. दिलीप गांधी यांचे नाव आहेच ; परंतू डॉ. सुजय विखेंना आ. कर्डिलेच कडवे आव्हान देऊ शकतात. अशी चर्चा सुरू असतानाच आ. लाड, आ. कर्डिले, आ. राजळे यांच्यातील गुप्तगूमुळे आ. कर्डिले यांच्या नावाबाबत भाज़पा श्रेष्ठींमध्ये खलबते सुरू आहेत.