नासा विक्रमचा माग काढण्याचा प्रयत्न करणार

Ahmednagarlive24
Published:

गत ७ तारखेला विक्रमची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील सॉफ्ट लँडिंग फसली होती. तेव्हापासून त्याच्याशी कोणताही संपर्क झाला नव्हता. नासाच्या चंद्राभोवती घिरट्या घालणाऱ्या ‘लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर’ने (एलआरओ) गत १७ तारखेला या लँडिंग स्थळाची काही छायाचित्रे काढली होती.

त्यात विक्रमच्या लँडिंगचे अचूक स्थान किंवा त्याच्या स्थितीची कोणतीच माहिती मिळाली नाही. ‘विक्रमची चंद्रावर हार्ड लँडिंग झाली असून, अंतराळ यानाच्या अचूक स्थानाची अद्याप माहिती मिळाली नाही,’ असे ‘नासा’ने या प्रकरणी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

‘१४ ऑक्टोबर रोजी पुन्हा ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग स्थळावरून जाईल. तेव्हा तिथे चांगला प्रकाश असेल. त्यावेळी पुन्हा तेथील छायाचित्रे काढून विक्रमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल,’असे नासाच्या ‘गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर’चे एलआरओ मोहिमेचे उपप्रकल्प संशोधक जॉन कॅलर यांनी याविषयी सांगितले आहे.

दरम्यान, विक्रमचे आयुष्य चंद्रावरील एका दिवसाचे म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवसांएवढे होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडते. या वातावरणात तेथील तापमान ‘उणे २००’ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. एवढे तापमान लँडर सहन करू शकत नाही. त्यामुळे विक्रमशी यापुढे संपर्क होण्याची कोणतीही शक्यता नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment