कोपरगाव : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या मसुद्याच्या वेळी कोण आमदार होते? कायद्याच्या मंजुरीच्या वेळी सरकार कोणाचे होते? तेव्हा कोल्हे यांनी विरोध का केला नाही? मी तर विरोधातील आमदार होतो.
मागील वर्षीच्या दुष्काळात पोलीस बंदोबस्तात आपल्या बंधाऱ्यातील पाणी खाली सोडण्यात आले. त्यावेळी राज्यात व देशात ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे. त्या तालुक्याच्या आमदार मुग गिळून गप्प बसल्या. आपल्या हक्काचे पाणी घालवून ४० वर्षांत कोल्हे परिवाराने तालुक्याची माती केली असल्याची टीका माजी आमदार अशोक काळे यांनी कोळपेवाडी येथे केली.
अशोक काळे म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत अपयश येऊनही न थांबता आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन केले, उपोषण केले व हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहे. ४० वर्षांत कोल्हे परिवाराकडून त्यांच्या पक्षाचे सरकार असतानाही जी विकासकामे झाली नाही ती विकासकामे मी विरोधी पक्षाचा आमदार असताना करून दाखवली.
मात्र, माझ्या विकास कामांचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात कोल्हे परिवार मागे पुढे पाहत नाही. कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठी चार नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरणासाठी मी आणलेला दोन कोटी रुपयांचा निधी मला श्रेय मिळणार होते, म्हणून त्यांनी परत जाऊ दिला व कोपरगावच्या नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले.
पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी मी सर्वप्रथम दाखल केलेल्या याचिकेची न्यायालयाने दखल घेऊन त्याबाबत सरकारला पाऊले उचलण्यास सांगितले असून, त्याचा आशुतोष पाठपुरावा करीत आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी व आपल्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आशुतोषला साथ द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.