काँग्रेसचा निवडणुकीवर बहिष्कार

Ahmednagarlive24
Published:

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यानंतर राज्यात होऊ घातलेल्या गटविकास परिषदेच्या (बीडीसी) निवडणुकीवर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. राज्य प्रशासनाची उदासीन भूमिका आणि वरिष्ठ नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याचा हवाला देत काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने जम्मू-काश्मीरला उद्ध्वस्त केले, असा आरोपसुद्धा काँग्रेसने केला आहे.

जम्मू-काश्मिरात येत्या २४ ऑक्टोबर रोजी बीडीसी निवडणूक होत आहे. गेल्या ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे; परंतु यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात घोषणा करीत प्रदेशाध्यक्ष जी.ए. मीर म्हणाले की, लोकशाहीप्रधान संस्थांना बळकटी देण्यात काँग्रेसचा विश्वास आहे.

काँग्रेसने कोणत्याही निवडणुकीपासून पळ काढलेला नाही; परंतु आमच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्यामुळे बीडीसी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यास आम्ही बाध्य झालो आहोत, असे त्यांनी सांगितले. जी.ए. मीर यांनासुद्धा नजरकैदेत ठेवण्यात आले होते; परंतु त्यांची नुकतीच मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य प्रशासनाने खोडसाळपणे मुख्य प्रवाहातील पक्षांच्या मार्गात अडथळे उत्पन्न केले.

आमच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. काँग्रेसच्या राजकीय हालचालींना स्थगिती देण्यात आली. काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक निशाणा बनविण्यात आले. या माध्यमातून भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला, असा आरोप जी.ए. मीर यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment