महाविकास आघाडीने घूमजाव करू नये – महादेव जानकर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-  वीज बिलाच्या बाबतीत महाविकास आघाडीने घूमजाव करू नये. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी लाइट बिल सरसकट पूर्णपणे माफ केले पाहिजे.

एखाद्या उद्योगपतीचे बिल एका मिनिटात माफ होते. परंतु सामान्य शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, मध्यमवर्गीयांच्या प्रश्नावर मात्र फार कायदा दाखवण्याचा प्रयत्न होतो. कोरोनामुळे सर्व जनता त्रस्त आहे. त्यामुळे लाइट बिल माफ करू, असे या सरकारने जाहीर केले होते.

त्यानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. जानकर म्हणाले, कोणत्याही पक्षाला एखाद्या जातीच्या विरोधात जाणे महागात पडेल. धनगर समाजाची केस कोर्टात आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु सध्याच्या राज्य सरकारने बजेटमध्ये त्यासाठी एक रुपयाचीही तरतूद केली नाही. धनगर समाजाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा खर्चदेखील आमचे राज्य सरकार भरत होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे.

आता मराठा समाजाच्या कामासाठी जसे पैसे भरत आहात त्या पद्धतीने धनगर समाजाच्या वकिलांची फीदेखील भरावी आणि फडणवीस सरकारच्या काळात आम्ही ज्या तेरा योजना धनगर समाजासाठी लागू केल्या होत्या, त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी, अशीदेखील त्यांनी मागणी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment