बाजारपेठ अतिक्रमण मुक्त करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात नावजलेल्या कापडबाजारासह पेठेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. अतिक्रमणावर हतोडा टाकून हे ग्रहण तातडीने सोडवा अशी मागणी महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशने केली आहे.

त्यासाठी व्यापारी प्रभारी आयुक्त तथा कलेक्टरांच्या द्वारी पोहचले. कापड बाजार, गंजबाजार, शहाजी रोड, नवी पेठ, मोची गल्ली ही बाजारपेठ संपूर्ण महाराष्ट्रात नावाजली जाते. यातील कापड बाजाराला राज्यात वेगळे स्थान आहे. गेल्या काही वर्षात बाजारपेठेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे.

बाजारपेठेचा परिसर अतिक्रमण व समस्यामुक्त करणे गरजेचे असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव देडगावकर, सेक्रेटरी किरण व्होरा यांनी तसे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक जाग येईल तेव्हा बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवते. मात्र अनेकदा पथक येण्याची टीप फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेत्यांना आधीच मिळते. त्यामुळे ते आधीच गाशा गुंडाळतात.

अनेक वेळा मनपाची अतिक्रमण विरोधी पथकाची पाठ फिरताच अवघ्या काही मिनिटात विक्रेते पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करतात. अनेक वेळा मनपाचे पथक बुधवारी बाजारपेठ बंद असलेला दिवस निवडून त्या दिवशी दिवसभर बाजारपेठ तैनात राहते. त्या दिवशी बाजार, बाजारातील बहुतांश दुकाने बंद असतात,

विक्रेतेही नसतात, त्या दिवशी कारवाई करण्यातून नेमके काय साध्य होते? महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे व रस्त्यावर अवैद्य रित्या व्यवसाय करणारे विक्रेते यांच्यातील पाठशिवणीचा खेळ आता सर्वांनाच ज्ञात झालेला आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

आपण दीर्घकालीन नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी केल्यास बाजारपेठेतील रस्ते मोकळे होण्याबरोबरच व्यापार्‍यांना या रस्त्यावरील विक्रेत्यामुळे होणारा त्रासही कमी होईल.

तसेच अतिक्रमणामुळे आज अनेक दुकानदार व्यावसायिक नवीन गुंतवणूक करण्यास धजावत नाहीत. काहींनी सावेडी केडगाव सारख्या उपनगरांमध्ये स्वतंत्र शाखा सुरु करण्यास सुरुवात केली आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात शहराचे मुख्य बाजारपेठ नावापुरती करण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment