अकलूज : विश्वासघातकी राजकारणामुळे पवारांची विश्वासार्हता संपुष्टात आली. त्यांची प्रचाराची पातळी घसरली आहे. विरोधकांमध्ये खरोखर ताळमेळच उरलेला नाही, असा हल्ला चढवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘अब की बार २२० पार’ अशी हाळी दिली.
लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३२५ खासदारांचे पाठबळ देऊन मतदारांनी एक मजबूत सरकार दिले. त्यामुळे अनेक धाडसी निर्णय घेता आले. आता महाराष्ट्राच्या विधानसभेत असेच बहुमत देऊन महाराष्ट्राच्या विकासाची संधी द्या, असे म्हणत भाजपचे मिशन ‘अब की बार २२० पार’ असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेळापूर येथील प्रचार सभेत सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार आहे हे खुद्द शरद पवार व राज ठाकरे यांनी मान्य केले आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी कालच एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, शरद पवारांची मला विरोधी पक्षनेता करण्याची ऑफर होती, तर राज ठाकरे यांनी आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, अशी मागणी केली आहे.
आज विरोधकांमध्ये ताळमेळ नाही. कोण कुठे आहे हे सध्या शोधावे लागत आहे. पवारांची प्रचाराची पातळी घसरली आहे. हातवारे करून ते काय बोलतात, तेच त्यांना कळत नाही. महाराष्ट्राला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण, विश्वासघातकी राजकारणामुळे त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे.