संगमनेर शहरातील वाडेकर गल्ली येथे राहणाऱ्या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.०३) दुपारी ४ नंतर समोर आली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. या दाम्पत्याच्या मोठ्या मुलाने साधारण सात दिवसांपूर्वी पुण्यात, तर लहान मुलाने यापूर्वी वाडेकर गल्ली येथील घरात आत्महत्या केली होती.
गणेश मच्छिंद्र वाडेकर (वय ५२), गौरी गणेश वाडेकर (वय ४८ रा. वाडेकर गल्ली) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. गणेश वाडेकर आणि गौरी वाडेकर यांच्या आत्महत्येप्रकरणी गणेश वाडेकर यांचा पुतण्या प्रशांत पद्माकर वाडेकर (रा. मोगरा कॉलनी, पंपिंग स्टेशन, संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यची नोंद केली आहे.
घरात गळफास घेऊन आत्महत्या
गणेश वाडेकर हे संगमनेर नगर परिषदेत कर्मचारी होते, त्यांनी काही महिन्यांपूर्वी ऐच्छिक सेवानिवत्ती घेतली होती. गौरी वाडेकर या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवेत होत्या.मंगळवारी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी प्रशांत वाडेकर यांना त्यांचे पुणे येथील नातेवाईक राजेंद्र कापरे यांनी फोनवरून गणेश आणि गौरी वाडेकर या दोघांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळविले.
पंख्याला ओढणीने गळफास
त्यानंतर प्रशांत वाडेकर यांनी तातडीने तेथे जाऊन पाहिले असता, घराच्या पहिल्या मजल्यावर बेडरूममध्ये गणेश वाडेकर यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला होता, त्याच बेडरूमच्या समोरील बेडरूममध्ये गौरी वाडेकर यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतलेला होता. पोलिसांनी त्या दोघांनाही खाली काढून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासणी करत त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. उत्तरीय तपासणीकरिता त्यांचे मृतदेह नेण्यात आले.
मोठ्या मुलाने सात दिवसांपूर्वी केली आत्महत्या
गणेश वाडेकर यांचा मोठा मुलगा श्रीराज वाडेकर (वय: २१) याने सात दिवसांपूर्वी पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. लहान मुलगा श्रेयस वाडेकर (वय: १६) याने दिड वर्षापूर्वी वाडेकर गल्ली येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आत्महत्या करण्याआधी दोन चिठ्ठ्या
पती-पत्नीने आत्महत्या करण्याआधी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना या दोन चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. वाडेकर यांच्या मुलाचा पुण्यात मृत्यू झाला होता, त्याच्या तपासकामात त्यांनी वाकड पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.