अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबींसह जिल्ह्यातील सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला विकासावर आधारित जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे काम गतीने पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा विकास आराखडाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले की, जिल्हा विकास आराखडा तयार करत असताना कृषी, उद्योग, पर्यटन, पशसंवर्धन विकास या बाबींबरोबरच विकासाच्या संधी आलेल्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात यावे. जिल्ह्यात दळणवळणाची साधने विकसित होत आहेत.
त्यादृष्टीनेही विकास आराखडा करत असताना नियोजन करावे. जीडीपी दर वृद्धीमध्ये कृषी विभागाचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीबरोबरच कृषीप्रक्रिया व स्टोरेजवर अधिक भर देण्यात यावा. राज्याच्या जीडीपी दरामध्ये जिल्ह्याच्या योगदानाची विभागनिहाय माहिती तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.