अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : उपनगर भागातील गांधीनगर, बोल्हेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न वारंवार होत असून, या गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांचा बंदोबस्त करावा तसेच या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नगरसेवक कुमार वाकळे यांच्यासह नागरिकांनी तोफखाना पोलिसांकडे केली आहे.
या संदर्भात नगरसेवक वाकळे यांच्या नेतृत्वाखाली सुनील भालेराव, मोहन गाडे, अरविंद आरखडे, सदानंद डहाळे, गणेश शिंदे, विशाल पाटील, अजय कुशवाह, किरण मेटे, नितीन उजागरे, सुरेश शिंदे, बाबासाहेब शिकारे, विकास गाडे, इनामुल हसन अन्सारी, शुभम कळसकर, अमोल वाघमारे आदींच्या शिष्टमंडळाने तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि. हरुण मुलानी तसेच उपनिरीक्षक के.बी.धायवट यांची भेट घेवून चर्चा केली तसेच निवेदन दिले.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गांधीनगर, बोल्हेगाव या भागामध्ये गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
नागरिकांनी घराबाहेर लावलेल्या गाड्यांच्या काचा फोडणे, महिला व युवतींची छेडछाड करणे, रात्रीच्या वेळी टोळक्याटोळक्याने दुचाकी गाड्यांवर फिरुन आरडाओरडा करणे, रात्रीच्या वेळी एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये घरी जाणाऱ्या कामगारांना अडवून मारहाण करणे, त्यांना लुटणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या टोळक्यांचा बंदोबस्त करावा तसेच या भागात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.