Ahmednagar News : रोज सकाळी उठायचं अन् डोंगर दऱ्यांतून सात किलोमीटर शाळेत जायचं…

Published on -

रोज सकाळी उठायचं अन् डोंगर दऱ्यांतून पाऊल वाटेने.. कच्च्या रस्त्याने.. वाट शोधत.. तब्बल सात किलोमीटर पायपीट करायची, तेव्हा कुठं त्यांना शाळा भेटते. ही व्यथा आहे, अकोले तालुक्यातील मुथाळने गावच्या विद्यार्थ्यांची देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी सर्वसामान्य माणसाला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे.

आपल्या देशात शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्वांना शिक्षण मोफत व सहज उपलब्ध झालं पाहिजे; पण अकोले तालुक्यातील मुथाळने गावच्या इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुला-मुलींना तब्बल रोज सात किलोमीटर पायपीट करून शाळेत जावे लागते.

तेवढेच किलोमीटर यावे लागते, असे रोज १४ किमी अंतर चालावे लागते. या गावातून सुमारे १०० मुलं-मुली रोज शाळेत जातात. या रस्त्यावर फार वर्दळ नसते. रस्ते निर्जन असतात. त्यामुळे मुला- मुलीना भीती वाटते. येण्यास रोज एक ते दीड तास आणि जायला एक ते दीड तास वेळ लागतो.

रोजची तीन तास पायपीट. त्यात मुलांना येवढे चालावे लागत असल्याने थकवा तर येतोच; पण ऊन, पाउस, थंडी याचाही सामना करावा लागतो. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी कधी कधी उशीरदेखील होतो, तर कधी शाळा बुडते. जाण्या येण्याच एवढा वेळ जात असल्याने याचा अभ्यासावर देखील परिणाम होतो.

पूर्वी गावात संगमनेर आगाराची बस यायची; परंतु तीदेखील बंद झाली. ती बस जरी येत होती तरी ती सकाळी ७ वाजता असायची. आमची शाळा सकाळी ११ वाजता आहे. असे काही विद्यार्थी सांगत होते. मुथाळने गाव अकोल्यापासून २० किमी तर समशेरपूर सात किमी आहे. गावातील मुलं समशेरपुरलाच शाळेला जातात.

हे गाव खूप उंचावर असून इथ पाऊस खूप पडतो; पण उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. अंगणवाडी व इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत इथे शाळा आहे; पण पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना समशेरपूरलाच जावं लागतं. गावाचं क्षेत्रफळ मोठे आहे. गावाला गर्दनी, टाकळी, ढोक्री, समशेरपूर, कोंभाळणे या गावच्या शिव आहेत.

या गावात बहुसंख्य लोक हे आदिवासी व कानडी समाजाचे आहेत. हे गाव पेसामध्ये मोडते, तरी प्रशासनाने या विद्यार्थ्यांची ही पायपीट थांबवावी व त्यांची येण्या-जाण्याची किंवा गावातच शिक्षणाची सोय करावी, अशी मागणी मुथाळने ग्रामस्थांनी केली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News