अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गत तीन ते चार दिवसांपासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भातखाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. भंडारदरा परिसर पावसाचे माहेरघर समजला जाते.
हमखास पावसाचे ठिकाण असल्याने येथील प्रमुख पीक भात आहे. मे महिन्याच्या शेवटी प्रामुख्याने भाताची पेरणी करायची, असा येथील शेतकऱ्यांचा नित्यक्रम आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे लवकरच लावणीयोग्य झाली असल्याने शेतकऱ्यांनी भाताची लागवड (आवणी) सुरु केली आहे.

घाटघर, रतनवाडी, पांजरे, उडदावणे, मुरशेत, कोलटेंभे या भागात प्रामुख्याने भात लागवडीस वेग आल्याचे दिसुन येत आहे. दरवर्षी भाताची लागवड करायची व पंढरीच्या विठोबारायाची वारी करायची, असा येथील शेतकऱ्यांचा कायमचा प्रवास आहे;
मात्र यावर्षी आषाढी एकादशीच्या अगोदर दोन दिवस पाऊस सुरु झाल्याने भात लागवड न करताच अनेकांनी पंढरीचे दर्शन घेतले. लवकर आवणी सुरु झाल्याने भात लागवडीसाठी शेतमजुर उपलब्ध होत असल्याने भात लागवड लवकर होत असली तरी आणखी आठ दिवसांनी सर्व शेतकऱ्यांच्या भात लागवडी सुरु झाल्यास मजूर मिळणे मुश्कील होणार आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे कोसळणे सुरुच असुन शेंडी परिसरात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी असल्याचे दिसुन आले. शुक्रवारी रात्री वाकी लघुबंधरा पुर्ण क्षमतेने भरला असल्याने निळवंडे धरणात नविन पाण्याची आवक सुरु झाली आहे.
निळवंडे धरणाचा पाणीसाठा २४% झाला आहे, तर भंडारदरा पाणलोटात सातत्याने कोसळत असलेल्या पावसाने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गेल्या २४ तासात एकुण २५० दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. त्यातील ७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला.
१८० दशलक्ष घनफूट पाणी धरणाच्या साठ्यात जमा झाले आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ६५३० दशलक्ष घनफूट झाला आहे, तर धरण ५९% भरले. वाकी बंधाराही पुर्ण क्षमतेने भरल्याने कृष्णावंती नदी तलावावरुन १०२२ क्युसेकने पाणी नदीपात्रात वाहत आहे.
या धरणाच्या पाणीसाठ्यावर अंतु सगभोर हे लक्ष ठेवून आहेत. गेल्या २४ तासात भंडारदरा येथे ६७ मीमी पाऊस पडला, तर घाटघर येथे ७५ मीमी, रतनवाडी ७३ मीमी, पांजरे ६५ मीमी तर वाकी येथे ५२ मीमी पावसाची नोंद झाली आहे.