अहमदनगरकर इकडे लक्ष द्या या , भंडारदरा धरणाचे नाव बदलले ! शासनाचा अध्यादेश जारी

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील ब्रिटिशकालीन धरण म्हणून समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या जलाशयाचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय, असे नामकरण करण्यात आले असून शासनाकडून नुकताच अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे ब्रिटिशकालीन धरण समजले जाते. १९२६ साली भंडारदरा धरण बांधून पूर्ण झाले. त्या वेळचे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली विल्सन यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करून धरणाला विल्सन डॅम, असे नाव देण्यात आले.

तेव्हापासून ते आज पर्यंत शासन दरबारी भंडारदरा धरण हे विल्सन डॅम या नावाने संबोधले जाते. तर भंडारदरा धरणाच्या जलाशयाला त्याकाळचे ब्रिटिश इंजिनियर ऑर्थर हिल यांचे नाव देण्यात आले होते.त्यामुळे भंडारदरा धरणाच्या जलाशयाला ऑर्थर लेक असेही संबोधण्यात येत होते.

अकोले तालुका हा आद्य क्रांतिकारकांचा तालुका समजला जातो. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध अकोले तालुक्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे यांनी संघर्षमय लढा उभारत आपले बलिदान केले होते- त्यामुळे भंडारदरा धरणाच्या जलाशयाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय, असे नामकरण देण्यात यावे, अशी आग्रही भूमिका माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली होती.

२०२१ पासून या नामकरणासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी भंडारदरा धरणावर आंदोलन उभारण्यात आले होते. पिचड पिता पुत्रांच्या या लढ्याला अखेर यश आले असून भंडारदरा धरणाच्या जलाशयाला अखेर आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय, असे नामकरण करण्यात आले आहे. शासनाने तसा अध्यादेश जारी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe