Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही अनेक अर्थाने खूप वैशिष्ट्यपूर्ण असून निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणूक 2019 च्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यावेळी भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस अशी सरळ लढत होती.
परंतु आपल्याला माहित आहे की शिवसेनेत फूट पडून त्यांचे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन पक्ष निर्माण झाले व त्याचप्रमाणे राष्ट्रवादीत देखील फूट पडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे दोन गट यामध्ये निर्माण झालेले आहे

त्यामुळे महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील असे सहा पक्ष आणि वंचित व इतर छोटे मोठे पक्ष मिळून एकूण बारा पक्ष या विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. त्यामुळे आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुती असो की महाविकास आघाडी यातील नेते उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून काम करताना दिसून येत आहेत.
याच मुद्द्याला धरून जर आपण अहिल्यानगर शहर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार संग्राम जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना साथ देण्यासाठी आजपासून त्यांना अधिकृतपणे समर्थन देण्यात आले असून भाजपचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या विधानसभा निवडणुकीत निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून काम करून त्यांना विजयासाठी योगदान देण्याचे निश्चित केलेले आहे.
महायुतीतील सर्व घटक पक्ष बरोबर घेत आमदार संग्राम जगताप यांचा जास्तीत जास्त प्रचार व काम करू असे प्रतिपादन अहिल्यानगर शहर भाजपचे अध्यक्ष ॲड.अभय आगरकर यांनी केले आहे.
अहिल्यानगर शहर भाजपने घेतला आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असून त्यामुळे अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीने महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत जाहीर केला व पार पडलेल्या या बैठकीमध्ये शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या.
या बैठकीवेळी ज्येष्ठ नेते सुनील रामदासी तसेच विधानसभा निवडणूक प्रमुख व महायुतीचे समन्वयक महेंद्र गंधे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड तसेच जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर बाबासाहेब वाकडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इतकेच नाहीतर या बैठकीत आमदार संग्राम जगताप यांचा शहर भाजपच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला व त्यांना विजयासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.
काय म्हणाले यावेळी आ.संग्राम जगताप?
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले की, भारतीय जनता पार्टीने मला समर्थन देण्याचे जाहीर केल्याबद्दल मी खरंच अंतकरणापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता येणार असून अहिल्यानगर जिल्ह्यातही सर्वात जास्त महायुतीचेच उमेदवार निवडून येतील यात शंका नाही.
मतदानासाठी खूप कमी दिवस आता बाकी राहिले असून कमी दिवसांमध्ये सर्वांनी आपापली योगदान देऊन जास्तीत जास्त प्रचार करावा व माझ्या विजयात मोठा सिंहाचा वाटा भाजपाचा असेल असं देखील त्यांनी म्हटले. तसेच या निवडणुकीमध्ये काही मंडळी मुद्दाम अपप्रचार करत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.
त्यामुळे त्यांच्या अफवांना बळी न पडता नागरिकांमध्ये जागृती करा. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा भाऊ आहे व या निवडणुकीत भाजपचे मोठ्या भावाप्रमाणे मदत करावी व मी देखील छोट्या भावासारखा तुमच्याबरोबर राहील असे आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी नमूद केले.