श्रीगोंद्यात बनावट वधूचा पर्दाफाश ! सत्यनारायण पूजेत धक्का…वधूने ऐकले आणि धूम ठोकली

Ahilyanagar News : श्रीगोंदा तालुक्यातील एका सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमात घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण गावात खळबळ उडवली आहे. नवविवाहित वधू आणि तिच्या मध्यस्थीने लग्नानंतर सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमातच बनावट ओळख उघड झाल्यानंतर धूम ठोकली. या घटनेने वराकडील मंडळींची केवळ फसवणूकच नाही, तर मोठ आर्थिक नुकसानही झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

तालुक्यातील एका युवकाचे लग्न पुणे येथील एका मध्यस्थीमार्फत ठरले होते. मुलाचे लग्न जमवण्यासाठी मध्यस्थीने दोन लाख 60 हजार रुपयांची मागणी केली होती. लग्न ठरवताना 40 हजार रुपये दिले गेले, आणि उर्वरित रक्कम लग्नानंतर देण्याचे ठरले. आळंदी येथे मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले आणि वधू सासरी नांदायला आली.

रितीरिवाजांनुसार सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला नातेवाईक आणि गावातील लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. याच दरम्यान, एका महिला पाहुणीने वधूला पाहताच धक्कादायक दावा केला की, हीच वधू मागच्या वर्षी तिच्या मुलाशी लग्न करून दोन लाख रुपये घेऊन पळून गेली होती.

बनावट वधूने ठोकली धूम

पाहुणीचा दावा ऐकताच, बनावट वधू आणि तिच्या मध्यस्थीला सत्यनारायण पूजेतूनच पळ काढावा लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वराकडील मंडळींनी मध्यस्थीकडे पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्यस्थीने पैसे परत देण्यास नकार दिला.

फसवणुकीचे प्रकार

लग्नासाठी मुली न सापडल्याने, काही लोक अशा मध्यस्थीच्या आमिषाला बळी पडतात. या टोळीचे बनावट वधू उभी करून वराकडील लोकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अशा घटना दिवसेंदिवस वाढत असून, फसवणूक झालेल्या लोकांना न्याय मिळणे कठीण झाले आहे.

लग्नही गेले आणि पैसेही गेले

वराकडील मंडळींनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. “लग्नही गेले आणि पैसेही गेले,” अशी अवस्था वर आणि त्याच्या कुटुंबीयांची झाली आहे. पोलिसांनी अशा टोळ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.

सावध राहा, सतर्क राहा

लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे. मध्यस्थाच्या आमिषाला बळी न पडता सर्व तपशील पडताळल्यानंतरच निर्णय घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe