प्रा.राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मधून दाखल केला उमेदवारी अर्ज! आता घड्याळ माझ्या विरोधात नाही तर बोनसच्या स्वरूपात माझ्यासोबत:प्रा.राम शिंदेची प्रतिक्रिया

Ahilyanagar News:- अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर कर्जत-जामखेड मतदार संघ हा राजकीय दृष्ट्या एक महत्त्वाचा मतदारसंघ असून या मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपाकडे गेला असून भाजपने या ठिकाणी प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विद्यमान आमदार रोहित पवार यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे.

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. जर आपण आताची विधानसभा निवडणूक पाहिली तर त्यामध्ये पूर्णपणे राजकीय गणिते बदलली आहेत व यामुळे रोहित पवार यांना कर्जत जामखेड मधून राम शिंदे यांच्या रूपाने एक तगडे आव्हान असणार हे मात्र निश्चित.

भाजपाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कालच प्रा. राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व यावेळी बोलताना मात्र त्यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

 मागच्या वेळी घड्याळ माझ्या विरोधात होते तर घड्याळ आता माझ्यासोबत

काल भाजपाकडून प्रा. राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, मी चार वेळा विधानसभा निवडणुकीला उभे राहिलो व दोनदा जिंकलो आहे व एकदा पराभव झाला.

परंतु आता चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीला सामोरे जात असून यावेळेस मात्र जनता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच या ठिकाणाहून समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पक्षाला मीच योग्य उमेदवार वाटला असेल म्हणून त्यांनी मला उमेदवारी दिली असे देखील त्यांनी म्हटले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडची जनता मला यावेळेस पाच वर्षे सेवा करण्याची संधी देईल असा देखील विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

 रोहित पवारांवर केली सडकून टीका

रोहित पवारांविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी म्हटले की,गेली पाच वर्षे त्यांनी फक्त जनतेला खोटी आश्वासने दिली व मतदार संघाच्या जनतेची फसवणूक केली. तसेच लोकांवर दबाव टाकण्याचे काम त्यांनी केले असा आरोप देखील त्यांनी रोहित पवार यांच्यावर केला.

लोकांना विविध प्रकारे त्रास देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले गेले. तसेच काही लोकांच्या  बदल्या करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम त्यांनी केले असे देखिल रोहित पवार यांच्यावर बोलताना त्यांनी म्हटले. कुठल्याही प्रकारचा विकास न करता या ठिकाणी फक्त त्यांनी लोकांना स्वप्न दाखवण्याचे काम केले.

त्यामुळे  आता लोकांना कळून चुकले की, उगाचच आपण बाहेरचा माणूस निवडून दिला व आपलाच माणूस पाडला. परंतु आता कर्जत जामखेडच्या जनतेला कळून चुकले की आपला हा आपलाच असतो, आपलाच माणूस आपल्या कामाला येतो.त्यामुळे आपलाच भूमिपुत्र असून आपण दुसऱ्याच्या तोंडाकडे का बघायचे? असे आता कर्जत जामखेड मधील जनतेला वाटू लागले असून त्यामुळे मला आता एक भूमिपुत्र म्हणून ही जनता आता माझ्या पाठीशी उभे राहिल्याशिवाय राहणार नाही असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच विकासाच्या दृष्टिकोनातून कर्जत जामखेड चा गेल्या पाच वर्षात कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही. तसेच त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, मी जेव्हा कॅबिनेट मंत्री होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचवले.

कमी खर्चामध्ये आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन काढण्याचे जे काही देवेंद्र फडणवीस यांचे धोरण होते ते मी कर्जत जामखेडच्या शिवारामध्ये राबवले असं देखील त्यांनी या निमित्ताने म्हटले.परंतु नंतर राकरणातील एक बलाढ्य घराणं माझ्या विरोधात आले व लोकांना खोटी स्वप्न दाखवून ती स्वप्ने लोकांना खरी वाटली व माझा पराभव झाला असे देखील त्यांनी म्हटले.

परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी या मतदारसंघात कुठल्याही प्रकारचे काम केले नाही व आता त्यांना इथल्या जनतेला गेल्या पाच वर्षाच्या कामाचा हिशोब द्यावा लागेल. परंतु हिशोब देण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नसल्यामुळे ते आता फक्त नवटंकी करतील, काही इव्हेंट करतील व जनतेचा विश्वास परत एकदा संपादन करण्याचा प्रयत्न करतील.

परंतु त्यांनी आता कितीही प्रयत्न केले तरी कर्जत जामखेडची जनता आता भूमिपुत्राच्या पाठीशी  खंबीरपणे उभी राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. मागच्या वेळी जे घड्याळ माझ्या विरोधात होते. परंतु आता तेच घड्याळ माझ्यासोबत आहे व हा एक माझ्यासाठी बोनस असल्याचे त्यांनी म्हटले.