अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- कोरोना आजारावर उपयोगी ठरणारे रेमडेसीवीर इंजेक्शन बारामतीमध्ये मिळते पण जामखेडला मिळत नाहीत. जिल्ह्यात कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा नाही फक्त जामखेडमध्ये तुटवडा आहे.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तीन वेळा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला हे शासन व प्रशासनाच्या समन्वयाअभावी घडले आहे. तसेच सध्या गावागावात वाडी वस्तीवर अनेक मृत्यू होत आहेत
पण प्रशासनाकडून आकडे लपवले जात आहेत, असा आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी जामखेड शहरातील नऊ खाजगी कोविड सेंटरला भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता टिका केली. ते पुढे म्हणाले की, येथील लोकप्रतिनिधींनी प्रसिद्धी मिळवावी यासाठी आपले जाहिरातीचे फलक हे समाजसेवा करणारे डॉ.आरोळे हॉस्पीटलमध्ये लावतात.
त्यांनी पण स्वत: अर्थसाहाय्य खर्च करून प्रसिद्धी मिळवावी. जामखेडमध्ये जसे आरोळे कोविड सेंटर आहे याठिकाणी मोठया प्रमाणावर रूग्ण आहेत. प्रशासनाने येथील भार कमी करण्यासाठी तालुक्यातील खर्डा, अरणगाव व नान्नज येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करून
तेथील रूग्णांवर तेथेच उपचार करावेत. तसेच खासगी कोविड सेंटरला भेट दिल्यावर येथील डॉक्टरांच्या मते बेड शिल्लक आहेत पण प्रशासनाकडून ऑक्सिजन पुरवठा होत नाही. येथील अधिकारी हे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत.
त्यामुळे उपचार करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे खाजगी कोविड सेंटरच्या सर्व अडचणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात येतील.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|