श्रीगोंदे: नागवडे सहकारी साखर कारखान्याने सहकार कायद्याच्या कलम २६ (२)( ब ) नुसार दरवर्षी वित्तीय वर्षे संपताना ४३ संस्था सदस्यांचे क्रियाशील आणि अक्रियाशील असे वर्गीकरण करून, त्याला संचालक मंडळाची ठरावाद्वारे मान्यता घ्यावयास हवी होती.
त्यानंतर ३० एप्रिल अखेर अक्रियाशील संस्था सदस्यांना विहित पध्दतीने ( पोच घेऊन) नमुना डब्ल्यू नुसार कळवावयास हवे होते व तरतुदीतील निकषांची पूर्तता करण्याची संधी द्यावयास हवी होती.
अक्रियाशील संस्था सदस्यांनी एक तर निकषांची पूर्तता केली असती किंवा ६० दिवसांच्या आत निबंधकाकडे अपिल दाखल केले असते, असे प्रतिपादन रविवारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी केले.
प्रा. दरेकर म्हणाले, मार्च २०१९ पर्यंत पाच वेळा संस्था सभासदांचे वर्गीकरण करून दर वर्षी ३० एप्रिलच्या आत त्याना कळवले असते, तर ते सावध होऊन पुढील वार्षिक सभेला प्रतिनिधी हजर ठेवण्याची काळजी संस्थेने घेतली असती.
कारखान्याच्या हलगर्जीपणामुळे ३३ संस्था सदस्यांवर अक्रियाशील सभासद होण्याची वेळ आली. याला कारखाना जबाबदार आहे. कारखाना प्रत्येक वार्षिक सभेची नोटीस संस्था व सदस्यांना वेळेत पाठवत नाही.
या संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याच्या अध्यक्षांच्या निर्देशाप्रमाणे ९ डिसेंबर २०१९ रोजी साखर कारखान्यावर जाऊन अपात्रतेची पूर्तता करून द्यावी, अशी पूर्तता काही अक्रियाशील संस्थांची यापूर्वीच करून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना क्रियाशील सभासद केले असल्याबद्दल प्रा. दरेकर यांनी नागवडे यांचे अभिनंदन केले. दरम्यान, प्रा. दरेकर यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.