पेट्रोलियम पाईपलाईन कामासाठी जमीन अधिग्रहणाला शेतकर्‍यांचा विरोध.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- दोन ते चार हजार रुपये प्रति गुंठा या कवडीमोल भावाने इंडियन ऑइल पेट्रोलियम पाईपलाईनच्या कामासाठी चालू असलेले जमीन अधिग्रहण तातडीने थांबविण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली.

जमीन अधिग्रहण कायदा 2013 प्रमाणे जास्तीत जास्त मोबदला मिळण्याबरोबर शेतकर्‍यांना विश्‍वासात घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देऊन चर्चा करण्यात आली.

या आंदोलनात बाळासाहेब कांडेकर, पोपटराव कांडेकर, जानकु कांडेकर, अ‍ॅड.योगेश गेरंगे, महादेव गवळी, केशव गेरंगे, प्रकाश मुंडलिक, गुलाब कांडेकर, विकास कांडेकर, बापू कांडेकर, अशोक कांडेकर आदिंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

नगर तालुक्यातील मौजे हमीदपूर, इसळक, निंबळक, विळद, देहरे या गावामधून सोलापूर-कोयली (गुजरात) ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची पेट्रोलियम पाईपलाईन जाण्याचे काम प्रस्तावित आहे.

त्याबाबतच्या नोटिसा येथील ग्रामस्थांना देण्यात आलेल्या आहेत. तहसिल कार्यालयात याच्या सुनावणीच्या वेळेस ग्रामस्थांनी उपस्थित राहून या पाईपलाईन टाकण्याच्या कामास विरोध दर्शविला होता.

पेट्रोलियमची ही पाईपलाईन गावालगत असणार्‍या लोकवस्तीमधून जात असल्याने ग्रामस्थांच्या जीवितास या स्फोटक पदार्थापासून धोका निर्माण होणार असल्याचे ग्रामस्थांनी लक्ष वेधून प्राधिकरणाकडे हरकत घेतली होती.

सदरील गावे नगरच्या एमआयडीसी जवळ असल्याने येथील लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. तर येथील जमीनीला चांगले बाजारभाव आले आहेत. याचा विचार करुन शेतकर्‍यांना चांगला मोबदला देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.

मात्र दरम्यानच्या काळात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या प्राधिकरणाने शेतकर्‍यांना विचारात न घेता तसेच सदर ठिकाणची पहाणी किंवा ले आऊटच्या खुणा न करता संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांनी गावात येऊन गावामध्ये येऊन अधिग्रहण केल्या जाणार्‍या जमिनीबाबत मोबदल्याची शेतकर्‍यांना माहिती दिली.

हमीदपूर येथे 2,693 रु.प्रति गुंठा, निंबळकला 4,100 रु.प्रति गुंठा, तसेच इसळकला 3,100 रु.प्रति गुंठा अशाप्रकारे कवडीमोल बाजार मूल्य ठरविण्यात आले. यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी व असंतोष असून, शेतकर्‍यांचे जमीन कवडीमोल भावात पेट्रोलियम पाईपलाईन करिता संपादित केल्या जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या प्रकल्पासाठी केले जाणारे जमीन अधिग्रहण शेतकरीविरोधी असून, जमीनीतून पेट्रोलियमची पाईपलाईन गेल्यास परिणामी त्या संपूर्ण भागात शेतकर्‍यांना शेती करता येणार नाही,

घराकरिता बांधकाम करता येणार नाही, बोअरवेल अथवा शेततळ्यासाठी खोदकाम करता येणार नाही.भविष्यात जमीन विक्री करण्याचे ठरविल्यास त्याला चांगला मोबदला मिळणार नसल्याचे शेतकर्‍यांनी स्पष्ट केले आहे.

यासर्व गोष्टींचा विचार करुन प्राधिकरणाने जमीन अधिग्रहण कायदा 2013 प्रमाणे जास्तीत जास्त मोबदला देण्याची व शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता मनमानी पध्दतीने पेट्रोलियम पाईपलाईनच्या कामासाठी चालू असलेली जमीन अधिग्रहण त्वरीत थांबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment