लॉकडाऊनच्या काळात दारू तर नाहीत, तंबाखूही मिळेनासी झाली आहे. त्यामुळे अनेक व्यसनाधीन लोक निर्वसनी बनले आहेत. त्यामुळे हौशी लोकं नाराज असले, तरी त्यांच्या घरचे मात्र निवांत झाले आहेत.
लॉकडाऊनमध्ये स्टॉकवाल्याची मजा तर घेणारांच्या खिशाला सजा, अशी परिस्थिती आहे. तल्लफ महागल्याने व्यसनामुळे जोडल्या गेलेल्या मैत्रीच्या अतूट गट्टीत तंबाखूचा विडा, मद्याचा पेला, सिगारेटचा झुरका, गुटख्याची पुडी, माव्याचा घास व बिडी या वस्तू अडसर ठरू लागल्या आहेत.
जो तो मैत्री सोडून स्वत:चेच भागवू लागल्याने टेबलवरची यारी व मैत्रीला तडे जात आहेत. लॉकडाऊनने भल्याभल्यांना पुरते बंदिस्त करून ठेवले आहे. १० रुपयांची तंबाखू २५ रुपयांना, तशीच दारूही दुप्पट तिप्पट भावात मिळते, अशी चर्चा आहे. त्यासाठी भाऊदादा करून ५० वेळा हातापाया पडावे लागते.
त्यामुळे व्यसनासाठी पूर्वीप्रमाणे मित्रांची कंपनी घेताना कोणी दिसत नाही. शिवाय ब्रॅँड सोडून अनेक गावठीकडे वळले आहेत. सिगारेट ओढणारेही बिडी ओढताना दिसत आहे. लॉक डाऊन असल्याने हाताला काम नाही, त्यामुळे उत्पन्न नाही, बाहेर पडता येत नाही. त्यामुळे व्यसन सोडविण्यासाठी कुठल्याही व्यसनमुक्ती केंद्रात अथवा डॉक्टरकडे जाण्याची गरज राहिलेली नाही.
लॉकडाऊनच्या सुरुवातीला व्यसनी व्यक्तीचा होणारा थरकापही आता थांबलेला आहे. बसल्या जागेवरून अंगणात, रस्त्यावर पिचकाऱ्या मारणेही बंद झाले आहे.
यातून धडा घेऊन व्यसनाधीन नागरिकांनी आता निश्चय करून या व्यसनाधिनतेला कायमची मूठमाती द्यावी. स्वत:चे व कुटुंबियांचे आरोग्य अबाधित ठेवावे, हीच यानिमित्ताने प्रामाणिक अपेक्षा व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात का होईना, पक्के बेवडे व्यसनमुक्त झाल्याने व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी विशेषत: महिलांनी लॉकडाऊनचे आभार मानले आहे. हा लॉकडाऊन व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी फायदेशीर ठरला आहे.