अदानी उद्योग समूहाच्या संदर्भात जेष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून, जेपीसीच्या मागणीवरून राजकारण करणारे विरोधक देशातील गुंवणूकदारांचे झालेले अर्थिक नूकसान भरून देणार आहेत काॽ असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
भारताची प्रतिमा जगामाध्ये आज वेगळ्या स्वरुपात
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा आलेख उंचावत आहे. मोदीजींच्या यशस्वी कारकीर्दीवर विरोधकांना कुठेही बोट ठेवायला जागा नाही. आज जगातील कित्येक भांडवलदार देश अडचणीत असताना भारतात खासगी उद्योगांच्या माध्यमातून होत असलेली गुंतवणूक उद्योग व्यवसायाची प्रगती महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच भारताची प्रतिमा जगामाध्ये आज वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विरोधकांचे हे कारस्थान कदापीही यशस्वी होणार नाही !
परंतू हिडनबर्ग सारखी कोणतीतरी संस्था येवून आहवाल देते आणि एखाद्या उद्योग समूहाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. यावर विरोधक करीत असलेल्या राजकारणावर टिका करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, न्यायालयाने यासाठी समिती नेमली आहे. समितीचा काय अहवाल यायचा तो येईल. परतू जेपीसीच्या मागणीवरुन संपूर्ण संसद आणि देशाला वेठीस धरण्याचे विरोधकांचे सुरु असलेले काम हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी असले तरी, विरोधकांचे हे कारस्थान कदापीही यशस्वी होणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुख्यमंत्री होणार ? एका शब्दात उत्तर !
सोशल मीडियावर माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्त हे कपोलकल्पीत आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अशा वावड्या पसरविण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. माझी बदनामी करण्याच्या हेतू आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही, राज्याला ना.एकनाथ शिंदे आणि ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व मिळाले आहे. राज्याचा निर्णय हा प्रधानमंत्र्याच्या स्तरावर झाला असल्याने यामध्ये कुठलीही विसंगती असण्याचे कारण नाही असे स्पष्ट मत ना.विखे पाटील यांनी व्यक्त केले.
नैसर्गिक संकटात टिका टिपण्णी करण्यापेक्षा सरकारला सुचना
आम्ही आयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनाला गेलो असलो तरी, राज्यातील नैसर्गिक आपत्तीकडे कोणतेही दुर्लक्ष आमचे झालेले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वचजन आज पाहाणी दौ-यासाठी बाहेर पडले आहेत. या नैसर्गिक संकटात टिका टिपण्णी करण्यापेक्षा सरकारला तुम्ही सुचना कराव्यात असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी विरोधकांना केले आहे.
शेतक-यांना १ रुपयात विमा देण्याचा निर्णय !
सातत्याने होणा-या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक मदत करण्यातही मर्यादा आल्या आहेत. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पिक विमा योजनेचे नवे सर्वकंश धोरण आणले आहे. शेतक-यांना कोणताही आर्थिकभार न देता १ रुपयात विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या पिक विमा योजनेची व्यापकता वाढवून शेतक-यांना सरंक्षण देण्यासाठी आता पाऊल टाकावी लागणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.