Mini Tractor:- यांत्रिकीकरणाच्या या युगामध्ये कृषी क्षेत्र देखील आता मागे राहिले नसून कृषी क्षेत्रातील विविध कामांकरिता अनेक प्रकारचे यंत्रे विकसित करण्यात आलेले असून त्यामुळे शेतीची कामे आता कमीत कमी वेळेत आणि खर्चात करता येणे शक्य झाले आहे. त्यातल्या त्यात जर आपण शेती यंत्राचा विचार केला तर यामध्ये ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
अगदी शेतीची पूर्व मशागत आणि पीक काढणीनंतर शेतीमाल वाहतुकीसाठी देखील ट्रॅक्टर वापरले जाते. तसेच फळ बागायतदार शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असणे गरजेचे असते. परंतु फळबागायतदार शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मोठ्या आकाराचे ट्रॅक्टर फळबागांमध्ये फिरणे शक्य नसल्यामुळे फळबागायतदार शेतकरी हे मिनी ट्रॅक्टर घ्यायला पसंती देतात.
छोट्या शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या ट्रॅक्टर ऐवजी छोटे ट्रॅक्टर परवडतात. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये एक अशा छोट्या म्हणजेच मिनि ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत जे फळ बागायतदार आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरेल व या ट्रॅक्टरचे नाव आहे व्हीएसटी एमटी 171 डीआय सम्राट हे होय. याच ट्रॅक्टरची माहिती या लेखात घेऊ.
व्हीएसटी एमटी 171 डीआय सम्राट ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
हे एक मिनि ट्रॅक्टर असून ते 746 सीसी क्षमतेसह सिंगल सिलेंडर इंजिनमध्ये उपलब्ध आहे. या ट्रॅक्टरला वॉटर कूलिंग इंजिन देण्यात आले असून 17 एचपीचा हा ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर 47 nm टॉर्क जनरेट करतो. एवढेच नाहीतर कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरला वेट टाईप एयर फिल्टर देण्यात आलेले असून त्यासोबतच हा ट्रॅक्टर 13 hp पीटीओ पावर आणि 2800 आरपीएम जनरेट करतो.
ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक क्षमता 750 किलो इतकी आहे. तसेच या ट्रॅक्टरला कंपनीच्या माध्यमातून 31 किलोमीटर प्रतितासाचा वेग देण्यात आला आहे. त्यामुळे छोट्या प्रकारातली मालवाहतुकीसाठी हा उत्तम ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरचे वजन 800 किलोग्राम असून हा 1460 एमएम व्हिलबेसमध्ये तयार करण्यात आला आहे. ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स 275 एमएम ठेवण्यात आला आहे.
इतर छोटी परंतु महत्त्वाची वैशिष्ट्ये
कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरला मेकॅनिकल टाईप स्टेरिंग देण्यात आले असून पुढच्या बाजूला आठ आणि मागच्या बाजूला दोन रिवर्स गिअरसह गिअर बॉक्स देण्यात आला आहे. तसेच या ट्रॅक्टरची इंधन टाकी ही 18 लिटर क्षमतेचे आहे व हा ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्हसह येतो.
किती आहे या छोट्या ट्रॅक्टरची किंमत?
कंपनीच्या माध्यमातून व्हीएसटी एमटी 171 डीआय सम्राट ट्रॅक्टरची किंमत छोट्या शेतकऱ्यांना परवडेल या दृष्टिकोनातून ठेवण्यात आली असून संपूर्ण देशामध्ये या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत दोन लाख 88 हजार रुपये इतकी आहे. तसेच आरटीओ रजिस्ट्रेशन आणि वेगवेगळे टॅक्स असल्यामुळे काही राज्यांमध्ये या ट्रॅक्टरच्या किमतीत बदल दिसू शकतो. यासोबतच कंपनीच्या माध्यमातून दोन वर्षाची वारंटी देखील देण्यात आलेली आहे.