Tractor Information:- कृषी यंत्रांमध्ये जर आपण वेगळ्या प्रकारचे यंत्रांचा विचार केला तर यामध्ये ट्रॅक्टर हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. शेती व्यतिरिक्त इतर अवजड कामांसाठी देखील ट्रॅक्टरचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. इतर वाहनांच्या तुलनेमध्ये जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर ट्रॅक्टरचे काम हे कायमच अवघड आणि खडबडीत अशा रस्त्यांवरून असते व त्यामुळे इतर वाहनांपेक्षा ट्रॅक्टरची एकंदरीत रचना संपूर्णपणे वेगळी असल्याचे आपल्याला दिसून येते.
ट्रॅक्टरची इंधनक्षमता तसेच वजन उचलण्याची ताकद इत्यादी बाबी या इतर वाहनांपेक्षा प्रचंड असतात. यामध्ये जर आपण ट्रॅक्टरच्या रचनेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ट्रॅक्टरची चाकांचे रचना ही खूपच वेगळी असते. पुढची टायर छोटी व मागचे टायर त्या तुलनेने जास्त मोठी असतात व ही रचना काही महत्त्वाच्या बाबी समोर ठेवून केलेली असते. नेमके ट्रॅक्टरचे मागच्या बाजूचे टायर मोठे का असतात? असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल. यामागे देखील बरीच कारणे असून त्याचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
ट्रॅक्टरची मागची चाके मोठी का असतात?
शेताच्या दृष्टिकोनातून ट्रॅक्टरचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. शेतीच्या पूर्वमशागती मधील रोटावेटर तसेच नांगरणी इत्यादी अवजड कामांसाठी ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसेच शेतीकामांसाठी अनेकदा जड वस्तू वाहण्यासाठी किंवा नांगरण्याकरिता ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
या दृष्टिकोनातून ट्रॅक्टरच्या टायरांची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण रीतीने केलेली असते. ट्रॅक्टरचे दोन्ही छोट्या पुढच्या टायरचा विचार केला तर त्यांचा उपयोग फक्त ट्रॅक्टरची दिशा ठरवण्यासाठी केला जातो. ट्रॅक्टरचा जे काही स्टेअरिंग व्हील असते त्याला ही छोटे टायर जोडलेली असतात. म्हणजेच ट्रॅक्टर ड्रायव्हर त्याला ज्या दिशेला जायचे आहे
त्या दिशेने स्टेरिंग फिरवतो व ट्रॅक्टरला त्या दिशेला नेण्याचे काम ट्रॅक्टरच्या पुढच्या छोट्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून केले जाते. परंतु मागच्या साईडच्या मोठ्या टायरचा विचार केला तर अवजड भार वाहून नेणे या दृष्टिकोनातून या टायरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ट्रॅक्टरचे इंजिन हे डिझेल इंजिन असल्यामुळे ट्रॅक्टरची शक्ती खूप जास्त असते व यामुळेच मागील टायर संतुलित ठेवण्याकरिता आणि जड वस्तू सहजतेने वाहून नेता येईल याकरिता या टायर यांचा आकार मोठा असतो.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मागचे टायर रस्त्याशी पक्कड तयार करण्यात म्हणजेच ग्रीप तयार करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. कारण ट्रॅक्टर बऱ्याचदा खडबडीत रस्त्यावरून धावतो व अशा स्थितीमध्ये ट्रॅक्टरचा बॅलन्स राखण्याचे काम फक्त मागील टायरच्या माध्यमातून केले जाते. तसेच ट्रॅक्टरच्या दोन्ही टायर मध्ये जो काही फरक आहे त्यातील एक मोठे कारण म्हणजे छोटे टायर जे आहेत
त्यांच्या मदतीने ट्रॅक्टर कमी जागेमध्ये फिरवता येतो. समजा जर ट्रॅक्टरची चारही टायर मोठे राहिले असते तर ट्रॅक्टर वळवणे खूप अवघड बाब झाली असती. पुढचे टायर छोटी असल्यामुळे इंजिन वर खूप कमी वजन येते आणि कमी इंधन लागते. याच दृष्टिकोनातून बुलडोझरमध्ये देखील टायरांची रचना ट्रॅक्टर सारखीच असते व त्यामागे देखील हीच कारणे आहेत.