Cotton News : गेल्या काही दिवसांपूर्वी सीसीआय अर्थातच भारतीय कापूस महामंडळने कापूस खरेदी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यावर्षी सीसीआयने खुल्या बाजारात जो दर मिळतोय त्या दरात खरेदी चालू केली आहे.
म्हणजे नेहमीप्रमाणे सीसीआयने हमीभावात खरेदी सुरु केलेली नाही तर बाजारात जो दर मिळतोय त्याप्रमाणे खरेदी चालू केली आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य पणन महासंघ देखील कापूस खरेदीसाठी बाजारात उतरणार आहे.

यासाठी पणनमंत्र्यांकडे परवानगी मागितली जाणार आहे. संचालक मंडळ लवकरच यासाठी पणन मंत्र्यांची भेट घेणार आहे. निश्चितच यामुळे कापूस उत्पादकांना दुहेरी फायदा होणार आहे. तसेच यामुळे पणन महासंघाला देखील आर्थिक फायदा होणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पणन महासंघाने सीसीआय ज्या पद्धतीने कापूस खरेदी करत आहे तशी खरेदी करण्यास तयारी दर्शवली आहे.
या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनादरम्यान संचालक मंडळ पणनमंत्र्यांची भेट घेणार असून कापूस खरेदीचा प्रस्ताव सादर करणार आहेत. अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख यांनी सार्वजनिक केली आहे. सध्या कापूस हंगाम जोमात सुरू असून शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळत नसल्याने बाजारात कापसाची आवक कमी आहे.
गेल्यावर्षी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलहुन अधिक दर मिळत होता. यामुळे यंदा देखील तसाच दर मिळेल अशी आशा बाळगून कापूस उत्पादकांनी कापसाची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आता सीसीआयने खुल्या बाजारातुन कापूस खरेदीचा श्री गणेशा केला असल्याने याचा आधार कापूस दराला मिळणार आहे.
तसेच पणन महासंघाने देखील कापूस खरेदी ची तयारी दर्शवली आहे. खरं पाहता पणन मंत्री म्हणून दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारभार पाहत आहेत. परंतु हिवाळी अधिवेशनामुळे हे खाते दादा भुसे यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. संचालक मंडळ आता पणनमंत्र्यांची हिवाळी अधिवेशनादरम्यान भेट घेणार आहे.
या भेटीत संचालक मंडळाकडून सीसीआयच्या धरतीवर कापूस खरेदीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. सीसीआय चे सर्व नियम पाळून पणन कापूस खरेदी करेल यामुळे पणनला सीसीआयचे सबएजंट म्हणून खरेदी करण्यास मान्यता मिळावी असा प्रस्ताव राहणार आहे.
खरं पाहता पणन पहिल्यांदाच कापसाची खरेदी करेल असं नाही यापूर्वी देखील पणनकडून कापूस खरेदी करण्यात आली आहे. नेहमीच पणन महासंघाकडून 50 खरेदी केंद्र सुरू केली जातात यंदा मात्र 40 खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहेत. पणनकडून गेल्यावर्षी कापसाची खरेदी करण्यात आली नव्हती यंदा मात्र महासंघाने तयारी दाखवली आहे.
खरेदीसाठी पणन महासंघाला सीसीआय कडून कमिशन मिळते. यामुळे कापूस खरेदीचा आर्थिक फायदा पणनला देखील होणार आहे. तसेच यामुळे कापूस उत्पादकांचा देखील फायदा होणार आहे. अशातच आता ही खरेदी प्रत्यक्षात केव्हा सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.