अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- भाजप सरकारने जनतेतून सरपंच निवड करण्याचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून सरकारच्या या निर्णयाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावातूनच विरोध करण्यात आला आहे.
जोर्वे गावातील ग्रामसभेत या निर्णयाला विरोध करणारा ठराव करण्यात आला असून जनतेतूनच सरपंच निवड करण्याची मागणी करण्यात आली आहे. जोर्वे ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच झाली. या ग्रामसभेत करण्यात आलेल्या महत्वपुर्ण ठरावांपैकी सरपंच निवडीच्या विषयाचा ठरावही प्राधान्याने चर्चेचा ठरला. या ग्रामसभेत बाबासाहेब इंगळे यांनी थेट जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया कायम ठेवण्याचा ठराव मांडला यास हरिष जोर्वेकर यांच्यासह सर्वांनी अनुमोदन देवून पाठींबा व्यक्त केला.
या संदर्भात जोर्वे ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही निवेदनाची प्रत ठरावासह पाठविण्यात आली असुन यामध्ये ग्रामस्थांनी म्हटले आहे की, पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायत ही लोकशाहीचा पाया भक्कम करणारी व्यवस्था आहे. या शासकीय व्यवस्थेतून विधीमंडळ व संसदेच्या सभागृहात प्रतिनिधीत्व करणारी मंडळी तयार झाली.
पुर्वी ग्रामपंचायत निवडणूका झाल्यानंतर निवड झालेल्या सदस्यांमधुन सरपंच निवड होत असे. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात होत असलेली आर्थिक उलाढाल, सदस्यांची होणारी पळवापळवी आणि दमदाटी यातून वाढलेल्या गुन्हेगारीला निर्बंध घालण्यासाठी युती सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा कायदा केला होता.
परंतू आता महाविकास आघाडी सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया बंद करुन पुन्हा सदस्यांमधून सरपंच निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास मदत होईल. वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे विपरीत परिणाम विकास कामांवरही होईल अशी भिती या ठरावात व्यक्त करुन जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा कायदा पुन्हा लागु करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने लागु केलेल्या भारतीय नागरीकत्व सुधारणा कायद्याचे ग्रामसभेत स्वागत करुन या कायद्याला पाठींबा देण्यात आला. जोर्वे गावातील हद्दीतुन मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या वाळु उपशामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी खालवली असुन शेतीलाही पाणी कमी पडु लागल्याने जोर्वे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून तसेच वाळु माफीयांच्या वाढत्या मुजोरीला पायबंद घालावा. यासाठी ग्रामसभेत सर्वानुमते जोर्वे हद्दीतील नदीपात्रातून होणारा बेकायदेशीर वाळु उपसा बंद करण्याचा ठरावही करण्यात आला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com