अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. नगर-पुणे मार्गावरील जातेगाव घाटात ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, सुपा पोलिस ठाणे, पारनेर पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे आणि तोफखाना पोलिस ठाण्याच्या पथकांचा समावेश आहे.
रेखा भाऊसाहेब जरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी नगर येथील सिव्हील हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घडलेली घटना अशी कि, जरे सोमवारी कामानिमित्त पुणे येथे गेल्या होत्या. पुणे येथून कारने येत असताना जातेगाव घाटात त्यांना दोन हल्लेखोरांनी अडवले.
यावेळी एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात जरे गंभीर जखमी झाल्या. रेखा जरे यांच्या आई सिंधुबाई सुखदेव वायकर (वय 60, रा. माळी बाबळगाव, ता. पाथर्डी, जि. नगर) यांनी याबाबत सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे,25 ते 30 वयोगटातील दोन अज्ञात इसम आले. त्यांनी गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून रेखा यांच्याशी वाद घालून धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तिला ठार मारले. फिर्यादीने आरोपींचे वर्णन पोलिसांना सांगितले आहे. जरे यांच्या खुन प्रकरणाने नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा विविध क्षेत्रातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved