अहमदनगर ब्रेकिंग : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून ५ कोटींची फसवणूक, एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला १० ते १५ लाख रूपये नफा मिळेल, असे आमिष दाखवत ५ कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुश्ताक बनेमियाँ शेख (रा. डावखर रोड, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शहरातील वॉर्ड नंबर २ मधील राहिवासी आदिल बहोद्दिन जहागिरदार, त्याची पत्नी, भाऊ – इमान बहोद्दीन जहागिरदार व वडील बहोद्दीन जहागिरदार यांच्याविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर फियादीने म्हटले आहे की, आपले फर्निचरचे दुकान व सॉ-मिलचा व्यवसाय आहे. आर्थिक अडचणीमुळे सॉ-मिल व जागेची विक्री केली होती.

आपली जहागिरदार याच्याशी ओळख असल्याने मिळकत विकून पैसे आल्याची माहिती झाल्याने त्यांनी तुम्हाला दरमहा १० ते १५ लाख रूपये नफा मिळू शकतो, त्यातून तुमच्या बँकेचे व्याज परस्पर या पैशातून जाईल, असे आमिष दाखवले.

जहागिरदार याने माझ्याकडे श्रीरामपूर, औरंगाबाद येथील अनेक व्यापारी व डॉक्टरांनी ३५ ते ४० कोटी रूपये ठेव म्हणून गुंतवणूक केलेली आहे. तसेच आदिल यांचे वडील बहोद्दीन याने तुम्हाला पैसे न दिल्यास मी माझी शेती विकून तुम्हाला पैसे देईल, अशी हमी देत विश्वास संपादन केला. शेख यांनी सॉ-मिल व जागा विक्रीतून आलेल्या १ कोटी २० लाख रूपयांपैकी १५ लाख रूपये जहागिरदार यांना २० फेब्रुवारी २०२३ रोजी दिले.

यावेळी आरोपींनी स्टॅम्प पेपरवर करारनामा व ५ लाखांचे ३ धनादेशही दिले. तीनच दिवसात १ लाख रूपये रोख दिले. त्यामुळे त्यांच्यावरील विश्वास वाढला. त्यानंतर २० लाख रूपये २७ फेब्रुवारी २०२३ रोजी घेतले. पुन्हा नोटरी करून दिली. नफा न दिल्यास मुद्दल वसुलीसाठी ५ लाखाचे प्रत्येकी ४ धनादेशही लिहून दिले.

स्टॅम्पही नोंदवला. शेख यांना काही दिवसांनी ५ लाख रूपये रोख दिले. त्यानंतर २४ एप्रिल २०२३ रोजी शेख यांनी ५० लाख रूपये आरटीजीएसद्वारे आरोपींच्या खात्यावर पाठविले. त्यावेळीही करारनामा लिहून दिला. मात्र, त्यानंतर आरोपींनी १ रूपयाही शेख यांना दिला नाही.

अनेकदा त्यांनी मागणी केली, तेव्हा सध्या ट्रेडिंग बंद आहे. चिंता करू नका, एक चायना कंपनी मोठी गुंतवणूक देत आहे. ते पैसे आले की देतो, असे म्हणत वेळ मारून नेली. त्यानंतर ४ जुलै २०२३ रोजी शेख हे आरोपींच्या घरी पैसे मागायला गेले असता, त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून पुन्हा पैसे मागितले. तर जिवे ठार मारू, अशी धमकी दिली. शेख यांची ८५ लाखांची फसवणूक केली.

तसेच डॉ. अभिमन्यू उमाकांत माकणे (रा. ईश्वर हॉस्पिटल, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांचे ३ कोटी २० लाख ५८ हजार रूपये, आतिफ कूर रहेमान अब्दुल करीम शेख (रा. मिल्लतनगर, वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) यांचे १७ लाख ५० हजार,

असरार आसीफ शेख (रा. वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) यांचे १२ लाख ५० हजार आणि तौसिफ बालम पठाण (रा. गोपीनाथनगर, वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) यांचे २० लाख, असे एकूण ५ कोटी ८ लाखांची जहागिरदार कुटुंबाने फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक समाधान सोळके हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe