मला बिनविरोध येऊ द्यायचे नाही, म्हणून ते विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- खेळत्या भांडवलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आधार दिला. १४० कोटींचे कर्ज वाटले. त्यामुळे माझ्या विरोधात उमेदवार शोधण्याची वेळ विरोधकांवर आली, असा टोला माजी आमदार तथा विद्यमान संचालक शिवाजी कर्डिले यांनी मारला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शुक्रवारी कर्डिले यांनी १०९ पैकी १०० पेक्षा जास्त मतदार व समर्थकांसमवेत शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.

कर्डिले म्हणाले, नगर तालुक्यातील १०९ सोसायट्यांपैकी १०० ठराव आपल्याकडे आहेत. विकासकामांची पावती म्हणून दहा वर्षांपासून मी बिनविरोध निवडून येत आहे.

मी शेतकरी हिताचेच निर्णय घेतले. गायी, म्हशी घेण्यासाठी, तर महिलांना लघुद्योग चालू करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य केले. महाआघाडीकडे फक्त नऊच सोसायट्या शिल्लक राहिल्या आहेत,

तरीसुध्दा मला बिनविरोध येऊ द्यायचे नाही, म्हणून ते विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत. ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ४५ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत, असा दावाही त्यांनी केला.