अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- आमच्यासाठी पोलिस व्हॅनवरील लुकलुकणारा दिवा म्हणजे आकाश कंदील… पोलिस व्हॅनचा सायरनचा आवाज म्हणजे फटाक्यांचा आवाज… संकटात सापडलेला आणि आम्ही वाचवलेला अत्यवस्थ हीच आमची दिवाळी… अशा पद्धतीने जनतेच्या सेवेची शपथ घेणाऱ्या खाकीची दिवाळी साजरी होत आहे.
देशभर शासकीय, निम शासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना मात्र दिवाळी ऑन ड्युटीच साजरी करावी लागली. कोणताही सण, उत्सव असला तरी पोलिस कुटुंबापासून दूर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतात.
सध्या प्रत्येकजण जोरदार दिवाळी सेलिब्रेशन करत असतानाच ‘जनतेची सुरक्षा हीच आमची दिवाळी’ मानून पोलिस चोख कर्तव्य बजावत आहेत. जनता आनंदित तर आमची दिवाळी आनंदित जाईल, अशा भावना पोलिस व्यक्त करत आहेत. समाजातील सर्व घटकांतून दिवाळी हा सण दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो.
कामासाठी शहरात गेलेले नागरिक दिवाळीसाठी गावाकडे येतात. दिवाळी आली की, आप्तजणांकडे जाण्याचा ओढा सर्वांना लागलेला असतो. घरात तयार केलेल्या गोडधोड पदार्थांपासून खमंग चिवड्याचा स्वाद घेत परिवारासमवेत दिवाळी साजरी केली जाते. या धामधुमीत पोलिसांना मात्र या सणाचा आनंद घेता येत नाही.
दिवाळी सण असल्याने शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठ आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार हे ओळखून अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे असते. गर्दीचा फायदा घेऊन घातपाती कारवाया किंवा चोरीसारखे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांना डोळ्यांत तेल घालून रांत्रदिवस बंदोबस्तासाठी थांबावे लागते.
आपल्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या व आपल्या सर्वांची दिवाळी कलरफुल करण्यासाठी 24 तास कार्यरत असणाऱ्या पोलीस पथकाला आमच्याकडून ग्रँड सॅल्यूट… ‘जय हिंद’
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved