कोपरगाव : देशाच्या व जगातील साई भक्तांना शिर्डी येथे साई दर्शनाला येण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे माजी आमदार अशोकराव काळे यांनी विमानतळ आणले होते. या विमानतळासाठी काकडीच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी भूसंपादित करण्यात आल्या होत्या.
त्यावेळी विमान प्राधिकरनाणे या प्रकप्ल बाधित शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र आजपर्यंत विमानप्राधिकारणाने अजूनही अनेक आश्वासनाची पूर्तता केलेली नाही.
या आश्वासनाची विमानप्राधिकरणाने तातडीने पूर्तता करून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी विमानप्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आमदार आशुतोष काळे यांनी काकडी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री, टर्मिनल व्यवस्थापक एस.मुरली कृष्णा व सहाय्यक कार्यकारी अभियंता कौस्तुभ ससाणे आदी विमान प्राधिकरनांच्या अधिकाऱ्यां समवेत बैठक घेऊन विमानतळा संदर्भात असलेल्या अडचणींचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली त्यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची विमानसेवा बंद आहे ही सेवा तातडीने सुरू करावी तसेच रात्रीची सेवा सुरू करावी, काकडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी. रन वे वरचे पाणी वळवून काकडी गावातील पाझर तलावात सोडावे. टॅक्सी चालक, छोटे कॉन्ट्रॅट स्थानिकांना देण्यात यावे.
काकडी प्रकप्लग्रस्त भूमीपुत्रांचे प्रश्न मार्गी लावावे. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे. प्रकल्पबाधित ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना त्वरीत मोबदला देण्यात यावा.
नवीन भूसंपादन करताना जमिनीचा दर जास्तीत जास्त देण्यात यावा व काकडी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वीजेचे बल्ब बसवावे अशा प्रकारच्या स्थानिक प्रकल्प ग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या अनेक सूचना आमदार आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकारणाला दिल्या.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील शिंदे , बाबासाहेब गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ आदींसह काकडी परिसरातील प्रकल्पबाधीत शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.