अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना यांमध्ये वाक्युद्ध रंगले आहे. कंगनाने अनेक आरोप शिवसेना आणि राज्य सरकारवर केले.
त्यातच तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अरेतुरेची भाषा करत टीका केल्यांनतर मात्र कंगनावर टीकेची झोड उठली. याचा निषेध करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

कंगना विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी शिवसेनेने भाजपाला ‘राज्यातील राष्ट्रपती राजवट एका रात्रीतून हटवून पहाटे शपथविधी होऊ शकतो, आरेच्या जंगलातील झाडे रात्रीतून कापली जाऊ शकतात,
फक्त तीन तास झोपणारे पंतप्रधान देशातील २६ सार्वजनिक उद्योग विकू शकतात, तर मग बेकायदा बांधकामप्रकरणी आधी नोटीस देऊन ते पाडले तर त्यात गैर काय?’, असा सवाल विचारत हल्लाबोल केला आहे.
पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, विजय डोळ, शिवसेना उपशहर प्रमुख संदीप मोढवे यांनी हे निवेदन दिले आहे.
यावेळी बोलताना शेळके म्हणाले, ‘राज्यातील सध्याचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर नेले जात आहे. दारू पाजणारे बाहेरचे आणि शिवीगाळ करणारेही बाहेरून बोलाविण्यात येत आहेत.
कोरोनाचे संकट सुरू असताना भाजप कडून खालच्या पातळीचे राजकारण खेळले जात आहे. कंगना आणि तिच्या आईकडून सोशल मीडियातून अतिशय खालच्या पातळीवर टीका केली जात आहे.
त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी राजकारणासाठी अस्मिता गहाण टाकण्याचा उद्योग सुरू केला आहे असा हल्लाबोल त्यांनी केला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved