अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- गौरी प्रशांत गडाख यांच्या स्मृतिनिमित्त सोनईत वाचनालय सुरू करू, असा संकल्प यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केला आहे. आगामी वर्षभरात हे वाचनालय सुरू होणार आहे .
प्रशांत गडाख यांनी दशक्रिया विधीप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या दहा दिवसांच्या काळात माझ्या दोन लहान मुलींनी मला सावरले. समाज मित्रांनी मोठा आधार दिला. कितीही दुःख झाले, तरी त्याचे परिवर्तन नवनिर्मितीत करायचे ही साहेबांची शिकवण माझ्या मनात घट्ट रुजलेली आहे.
म्हणूनच गौरी यांच्या कर्मभूमीत सोनईत मी अद्यावत वाचनालय उभारण्याचा संकल्प करत आहे. पुढच्या पाडव्याला या वाचनालयाचे लोकार्पण होईल.त्यात तिच्या आठवणींचा समावेश असेल. हीच तिला श्रद्धांजली. गौरीला वाचनाची आवड लागावी यासाठी मी तिला पुस्तके द्यायचो.
परंतु सुरूवातीला अनुत्सुक असणाऱ्या गौरीला साहेबांनी पुस्तके देत वाचनाची आवड निर्माण केली. गडाख साहेबांची अत्यंत आवडती मुलगी गेली, असे ते म्हणाले. दशक्रियाविधीनिमित प्रवचनात उद्धव महाराज म्हणाले, जन्म मृत्यूचे चक्र प्रत्येकाला भेदावे लागते. जी गोष्ट देव-देवतांना चुकली नाही, ती आपल्यापैकी कुणालाही चुकणार नाही.
जीवन जगत असताना समाजासाठी आपण काही देणे लागतो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सामाजिक, धार्मिक, साहित्यासह अन्य क्षेत्रात अनेकांना चांगली शिकवण दिली आहे. गोरगरीब लोकांना आधार दिला आहे. तीच परंपरा प्रशांत गडाख चालवत आहेत.
प्रजापती ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या उषादिदी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. उद्धव महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गडाख कुटुंबीयांच्या वतीने ५१ हजारांचा धनादेश विश्वासराव गडाख यांनी दिला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved