नेवासा : नेवासा नगर पंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ येत्या १९ डिसेंबर रोजी पूर्ण होत असल्याने पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १८ डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. नेवासा नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक २४ मे २०१७ रोजी झाली. अडीच वर्षे असलेले नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने एकमेव भाजपच्या नगरसेविका संगीता दत्तात्रय बर्डे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.
आ. शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाने ९ जागा मिळवत बहुमत मिळवले असल्याने उपनराध्यक्ष पदावर नंदकुमार पाटील यांची वर्णी लागली होती.
त्यांचा कार्यकाळ येत्या १९ डिसेंबर रोजी संपत असल्याने पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली १८ डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी ११ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दुपारी दोन वाजेपर्यंत दाखल करावे लागणार आहे. याची छाननी त्याच दिवशी दपारी २ वाजेनंतर होणार आहे तर वैध सदस्यांची यादी १३ डिसेंबर रोजी सायंकाळनंतर जाहीर होईल. तसेच उमेदवारी अर्ज माघारीची मुदत १६ डिसेंबर रोजी ४ वाजेपर्यंत आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी १८ डिसेंबर रोजी १० ते १२ च्या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करावे लागणार आहे. दोन्हीही पदांच्या निवडी १८ डिसेंबर रोजी नगर पंचायत कार्यालयात होणाऱ्या विशेष सभेत करण्यात येणार आहे.