अहमदनगर – नगरच्या साहित्य चळवळीला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व माजी खासदार तथा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या घराची झाडाझडती घेताना प्रशासनाने त्यांच्याशी केलेल्या अशोभनिय वर्तनाचा निषेध करण्यासाठी नगरकर एकवटले.
विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी एकत्र येत निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकार्यांना देत चौकशीची मागणी केली. तसेच भविष्यात असे प्रकार यापुढे घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या अटकेसाठी पोलिसांनी यशवंतराव गडाख यांच्या यशवंत कॉलनीतील बंगल्याची झाडाझडती घेतली. वास्तविक शंकरराव घरात नाहीत, हे प्रशांत गडाख यांनी पोलिसांना सांगूनही त्यांनी ऐकले नाही. गडाख यांच्या बेडरुमपर्यंत जाऊन पोलिसांनी झाडाझडती घेत ज्येष्ठ साहित्यिक व सुसंस्कृत व्यक्तिमत्व यशवंतराव गडाख यांच्याशी अशोभनीय वर्तणूक केली.
त्याचा निषेध करण्यासाठी साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सोमवारी निवेदन दिले.
मसापचे सावेडी शाखाध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया, डॉ.एस.एस. दीपक, डॉ. व्हि.एन. देशपांडे, डॉ.भूषण अनभुले, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, राष्ट्रवादीचे माजी शहरजिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, मेधाताई काळे, शिवाजी साबळे, राजेंद्र गांधी, डी.एम.कांबळे, अशोक गायकवाड, स्नेहलयाचे गिरीश कुलकर्णी, पवन नाईक, संजू तनपुरे, सुरेश चव्हाण, राजेंद्र उदागे, श्रीनिवास बोजा, डॉ. क्रांतीकला अनभुले, अंगत गायकवाड, साहेबान जहागीरदार, संतोष बलदोटा, चंद्रकांत पालवे, बापू चंदनशिवे, शैलेश गवळी, ज्ञानेश शिंदे, अजित जगताप, मनिष चोपडा, अतुल रचा, संजय दळवी, हरिभाऊ डोळसे, अॅड.शेखर दरंदले यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख हे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अतिशय संस्कृत संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रासोबतच जिल्ह्यात सांस्कृतिक साहित्यिक जडण-घडण रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा असून 70 वर्षे अखिल भारतीय साहित्य संमेलन नगर येथे यशस्वीपणे आयोजित करून त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नगरचे नाव सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात अग्रभागी नेले.
शंकरराव यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर केलेल्या आंदोलन प्रकरणात त्यांच्या अटकेसाठी आलेल्या पोलिसांनी यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील निवासस्थानाची झडती घेताना गडाख कुटुंबीयांशी अशोभनीय वर्तन केले. त्याचा निषेध करत हा प्रकार निदंनीय आहे. गडाख यांनी चारित्र्य जपत निष्कलंक आयुष्य जगत आहे. त्यांच्या साहित्यिक राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रथमच पोलिसांनी अशा प्रकारचे वर्तन केल्याने त्यांना मनस्ताप झाला असून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे.
कोर्ट आदेशानुसार शंकरराव यांच्या अटकेसाठी पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही करत असताना गडाखांच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असे वर्तन केले. राजकारणामध्ये नेहमीच प्रेरणादायी असलेल्या तसेच एका आदर्श व्यक्तिमत्वाला त्रास देणे खेदजनक आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा निश्चितच आदर करण्यात येत असून, मात्र त्याचा आतेतायीपणा प्रशासनाकडून झाला तो अपेक्षित नव्हता या कृतीचा निषेध यावेळी करण्यात आला.
एका जेष्ठ सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा अपमान होणे हे खूपच क्लेशदायक आहे या कृतीने विविध क्षेत्रातील कार्य करणार्या कार्यकर्त्यांना अतीव दुःख झाले असून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी तसेच झालेल्या प्रकाराची आपल्या स्तरावर चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याची दखल घेत कलेक्टरांनी चौकशीचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ.भाऊसाहेब कांबळे, आ.सुधीर तांबे यांनीही या घटनेचा निषेध करण्यासाठी थेट जिल्हा पोलीस अधिक्षक ईशू सिंधू यांची भेट घेतली.
गडाखांच्या घराची झडती घेणे निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी चौकशीची मागणी केली. शंकरराव गडाख यांच्या अटकेसाठी पोलीस प्रचंड संख्येने पाठवून यशवंतराव गडाख व कुटुंबीयांसोबत जे पोलिसांनी वर्तन केले ते अत्यंत क्लेशदायक आहे. नवी मोगलाई सुरू झाल्याचे हे द्योतक आहे. जिल्हाधिकार्यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेणे गरजेचे असून राजकीय वैमनस्यातून ही कृती झाली असल्याची शंका ज्येष्ठ साहित्यीक रामदास फुटाणे यांनी वर्तविली