अहमदनगर :- शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सुमारे ३६० जणांवर शहरातून तीन दिवसांसाठी तडीपारीचे आदेश जारी केले आहेत.
यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह शिवसेना, भाजपचे माजी नगरसेवक, हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी व दंगलीतील काही आरोपींचा समावेश आहे.

दरम्यान, राठोड यांनी तहसीलदारांकडे राजपत्रित अधिकाऱ्यांचे ५० हजारांचे हमीपत्र सादर करुन अटी-शर्तींवर शहरात राहण्याची मुभा मिळवली आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने मिरवणूक काढण्यास परवानगी दिली की नाही याबाबत संभ्रम आहे.
कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुंडांची व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही राजकीय पदाधिकाऱ्यांना एक दिवसासाठी शहरातून तडीपार करावे, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता.
त्यावर सुनावणी झाल्यानंतर गुरुवारी व शुक्रवारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी सुमारे ३६० जणांच्या तडीपारीचे आदेश काढले. या सर्वांना २२ ते २४ मार्च या कालावधीत शहरातून तडीपार करण्यात आले.
एक दिवसासाठी तडीपार केलेल्यांमध्ये वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद शंकर छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत अशोक छिंदम (दाेघेही दिल्लीगेट) यांच्यासह माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक सुभाष लोंढे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, विक्रम अनिल राठोड, भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र दिलीप गांधी, नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे, रावजी बाळाजी नांगरे, मदन संपत आढाव, माजी नगरसेवक दिगंबर ढवण, सचिन जाधव, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख दिगंबर गेंट्याल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.