तोतयागिरी करणारा पोलिसांकडून गजाआड

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा : शासकीय अधिकारी असल्याचे भासवून तोतयागिरी करणाऱ्या व बनावट शासकीय ओळखपत्र बनवून त्याचा गैरवापर करणाऱ्या प्रसादकुमार बापूराव जठार, रा. लोणी व्यंकनाथ यास श्रीगोंदे पोलिसांनी गजाआड केले आहे.

त्याने अनेक ठिकाणी लोकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांना वर्तविली. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसादकुमार जठार याच्यावर श्रीगोंदा न्यायालयाने पकड वारंट काढले होते. प्रसादकुमार जठार हा आकुर्डी (पुणे) येथील एका हॉटेलसमोर येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कर्णवर, पोलीस कर्मचारी दादासाहेब टाके यांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, पॅन्टच्या खिशातील पाकिटामध्ये एक ओळखपत्र सापडले. त्यावर प्रसादकुमार जठार, अभियांत्रिकी सहाय्यक, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीगोंदा, त्यावर शिक्का व महाराष्ट शासन अशा आशयाचे ओळखपत्र होते.

याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे सांगितले. त्याचबरोबर या ओळखपत्राच्या आधारे शासकीय अधिकारी असल्याचे भासवत गैरवापर केल्याचेही समोर आले आहे.

पोलीस कर्मचारी अमोल कोतकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रसादकुमार जठार याच्याविरोधात भा.दं.वि. कलम १७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment