राहुरी –
केंद्र व राज्य शासनाच्या आपत्ती प्रतिसाद निधीतून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशा आशयाची मागणी राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
५ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील शेरी, चिखलठाण, कोळेवाडी, दरडगावथडी, म्हैसगाव या गावांमध्ये ढगफुटी झाली.

सलग चार तासांपेक्षा अधिक वेळ जोरदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांबरोबर काही ठिकाणी नदी व ओढ्याचा प्रवाह बदलल्याने शेतजमीनही वाहून गेली आहे.
परिसरात असलेले जलसंधारण बंधारे नाला बंडिंग पाण्याच्या पुरामुळे फुटलेले आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या शासनाच्या अखत्यारीतील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचून रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत.
ढगफुटीच्या तडाख्याने परिसरातील ग्रामस्थांच्या कच्चा व पक्क्या घरांचीही पडझड झाली. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी तनपुरे यांनी निवेदनाद्वारे केली.













