लवकरच माझी भूमिका स्पष्ट करणार -राजेश परजणे

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३१) आयोजित करण्यात आलेली कार्यकर्त्यांची बैठक गोदावरी दूध संघाबरोबरच दोन्ही साखर कारखान्यांच्या वार्षिक सभांमुळे तूर्त स्थगित ठेवण्यात आली असून, कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात राजकीय दिशा आणि भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती जि. प. सदस्य राजेश परजणे पाटील यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात परजणे यांनी सांगितले, कोपरगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक दोन ते अडीच महिन्यावर येवून ठेपली असून, त्यादृष्टीने तालुक्याच्या पूर्व भागात कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. सदर बैठकांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, माझ्या उमेदवारीसाठी लोकांकडून सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. 

मी उमेदवारी करावी, असा आग्रह गावोगावचे कार्यकर्ते करताना दिसून येत असून, गेल्या ४० ते ४५ वर्षांपासूनची प्रस्थापित सत्ता बदलण्यासाठी राजकीय परिवर्तनाच्या प्रवाहात लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसून येत आहे. पूर्व भागातील बैठकानंतर आता तालुक्याच्या उर्वरित गावांमध्ये बैठकांचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे.

येत्या तीन-चार दिवसात गोदावरी दूध संघासह दोन्हीही साखर कारखान्यांच्या वार्षिक सभा होणार आहेत. या संस्थांचे सर्व सभासद वार्षिक सभांना उपस्थित राहणार असल्याने ३१ तारखेची बैठक तूर्त स्थगित ठेवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून वाढल्याने ती स्थगित ठेवावी लागत आहे. 

तालुक्यातील राहिलेल्या गावातील बैठका घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेवून त्यात पुढील वाटचालीसंदर्भात योग्य दिशा आणि भूमिका आपण स्पष्ट करणार असल्याचेही श्री. परजणे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment