पाणी द्या; अन्यथा धडा शिकवू – खा. सदाशिव लोखंडे

Ahmednagarlive24
Published:

राहुरी : तालुक्यातील ३२ गावातील व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उभ्या पिकांसाठी योग्य क्षमतेने पाणी मिळत नाही. टेल टू हेडवरील सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही उभे राहून पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला.

मुळा व भंडारदरा धरणातून शेतीसाठी सोडले गेलेले आवर्तन योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना मिळत नसल्याने गुरुवारी खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा येथील पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी खा. लोखंडे यांच्यासह खेवरे व झावरे यांनीदेखील या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करत जाब विचाला. यावेळी शेतकऱ्यांच्या अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया समोर आल्या.

शेतीसाठी आवर्तन सुरू झाल्यापासून आम्ही वेळोवेळी पाटबंधारे खात्याकडे याबाबत पाठपुरावा करीत आहोत. कमी पावसामुळे पेरणी केलेली पिके हातातून जाण्याची चिन्हे आहेत. मात्र, आता आम्हाला चारा पिके देखील वाचविणे मुश्किल झालेले आहे.

अनेकवेळा मागणी करून देखील आम्हाला पाणी मिळत नसल्याने आमच्या हातची पिके जळून चालली आहेत. आधीच गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांवर आरिष्ट्य येत आहे आणि त्यातच पाटबंधारे खात्याच्या अनागोंदी कारभारामुळे आम्ही हताश झालेलो आहोत.

अधिकाऱ्यांनी आमच्या चाऱ्या दुरुस्ती केल्या नसल्याने पाणी कमी क्षमतेने पुढे येते. यात काही प्रमाणात सत्य असले तरी वरच्यांना पाटबंधारे अधिकाऱ्यांचे हस्तक अथवा काही अधिकारी आर्थिक मॅनेज करत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. लोखंडे म्हणाले, यापुढे असा कारभार आम्ही चालू देणार नाही. रोटेशन सुटल्यानंतर लाभधारक पहिल्या शेतकऱ्याला जो न्याय मिळतो तो अखेरच्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

आजची जिल्ह्यातील विशेषत: राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील पावसाची परिस्थिती बघितली तर कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी आपली पेरणी केलेली आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्च केलेले आहेत आणि आता ही पिके हातची जाणार असल्याने ते हतबल झाले आहेत.

त्यामुळेच त्यांचा संताप समोर येत आहे. येत्या दोन दिवसात या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या या पिकांसाठी कालव्याद्वारे पाणी दिले गेले पाहिजे; अन्यथा होणाऱ्या परिणामांना व या शेतकऱ्यांच्या रोषाला पाटबंधारे अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. सर्व शेतकऱ्यांना सामान न्याय दिला गेला पाहिजे.

आमचा कोणत्याही शेतकऱ्याला विरोध नाही. मात्र, जो न्याय वरच्या शेतकऱ्यांना तोच या रोटेशनवर अवलंबून असणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्याला असला पाहिजे. आम्हाला कोणी न्यायाची भूमिका देत नसेल तर आम्ही नेहमी संघर्ष केला आहे.

या शेतकऱ्यांचे नेतृत्व आम्ही करीत आहोत. संघर्षाची किती वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. मात्र, या खात्यात कोणी जर भ्रष्टाचार करत असेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या न्यायहक्काच्या पाण्यातून वंचित ठेवत असेल तर आम्ही त्याला धडा शिकवण्याची ताकद ठेवतो, असे खडे बोल खेवरे यांनी यावेळी सुनावले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment