नेवासे : आम्ही सगळे कुटुंबीय झोपेत असताना एलसीबीचे पोलिस घरात आले. त्यांनी घरात महिला लहान मुले असताना प्रत्येक रुमची झडती घेतली.
हे सर्व बघून आम्ही सर्वजण गोंधळलो. आम्ही पोलिसांशी चर्चा केली. ते शंकरराव गडाखांना अटक करायला आले होते.
आम्ही त्यांना सांगितले की, काही कामानिमित्ताने ते पुण्याला गेले आहेत. परंतु चर्चेने हा प्रश्न सोडवू शकत होते.
आमच्या कुटुंबाच्या आयुष्यात असे कधी घडले नाही. दुर्दैवाने यशवंतराव गडाख घरी असताना हे घडले याचे शल्य आमच्या सर्व कुटुंबीयांना आहे.
नेवासा तालुक्यात सूडाचे राजकारण सुरू झाले आहे. या जिल्ह्यात गडाख साहेबांनी अनेकांशी सत्तासंघर्ष केला.
परंतु आकसबुध्दी ठेवून आमच्या अनेक संस्थांवर चौकशी, मुळा एज्युकेशन संस्था पाडायची यासाठी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले.
घराची झडती घेणे ही खूप निंदनीय बाब असून नेवासा तालुक्यातील जनतेनेही याचा निषेध केला आहे.
क्रिमिनल गुन्हा नव्हता, लोकांच्या प्रश्नासाठी केलेले हे आंदोलन होते. मी पोलिसांना दोष देत नाही.
तर अशा राजकीय प्रवृत्तीला देतो, जे अशा प्रकरणात पोलिसांना बळी पाडतात, असा आरोप शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी केला आहे.